हरीश गुप्ता, नवी दिल्लीकाँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी शुभ वर्तमान आहे. सार्वजनिक लेखा समितीचे (पीएसी) अध्यक्ष पी. सी. चाको यांची मुदत ३0 एप्रिल रोजी संपत आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चाको यांना चौथ्यावेळेस अध्यक्षपद मिळण्याची शक्यता नाही. नोटाबंदीच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या भूमिकेबद्दल समिती पाचारण करू करील, असे चाको यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांचे पद जाऊ शकते, असे सांगितले जाते. पीएसीच्या बैठकीत भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि अजय संचेती यांनी चाको यांचे वक्तव्य हे अक्षम्य आहे, अशी तक्रार केली होती. चाको यांच्या जागी खरगे यांना आणण्याचे कारण मात्र राजकीय आहे. संसद भवनात खरगे यांना काँग्रेसचे नेते या नात्याने दालनच नाही. खरगे यांना विरोधीपक्ष नेत्याचा दर्जा न देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. पक्षाचा नेता म्हणून प्रभावीपणे काम करता यावे यासाठी खरगे यांनी संसद भवनात खोलीची मागणी सातत्याने केलेली आहे. संसद भवनात काँग्रेसला केवळ एकच खोली मिळालेली असून ती सोनिया गांधींकडे आहे. पीएसीच्या अध्यक्षांना खोली मिळते. खरगे यांना आणखी एक शक्तिशाली समिती देऊन काँग्रेस मतदारांना संदेश देईल. पीएसीचे अध्यक्षपद मुख्य विरोधी पक्षाकडे जाते. थॉमस यांनी पीएसी अध्यक्षपदाची मुदत सलग तीनवेळा पूर्ण केली व अशी संधी कितीवेळा मिळावी याला कोणतेही बंधन नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी तर हे अध्यक्षपद वेगवेगळ््या लोकसभेच्या कालावधीत पाच वेळा सांभाळले आहे.
लोकलेखा समितीचे अध्यक्षपद खरगेंकडे?
By admin | Published: February 25, 2017 12:29 AM