पाटणा/भुवनेश्वर - लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांची बिहार विधानसभेतून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. ओडिशातून बिजू जनता दलाचे दोन व भाजपचा एक उमेदवारही निवडून आला.केंद्रीय न्याय व कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची बिहारच्या पाटणा साहिब मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाल्याने त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्या जागी पासवान निवडून आले आहेत. पासवान यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता.ओडिशातूनही तीन जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली असून, त्यात भाजपचा एक व बिजू जनता दलाचे दोघे आहेत. बिजू जनता दलाचे अमर पटनायक व सस्मित पात्रा आणि भाजपचे अश्विनी वैष्णव अशी त्यांची नावे आहेत. बिजू जनता दलाचे अच्युत सामंता, प्रताप केसरी देब व सौम्य रंजन पटनायक हे तिघे लोकसभेवर निवड झाल्याने पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मात्र यंदा बिजदने दोनच उमेदवार उभे केले आणि तिसऱ्या जागेसाठी भाजपला पाठिंबा देऊ केला होता.माजी सनदी अधिकारी अश्विनी वैष्णव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते त्यांचे स्वीय सचिव होते. त्यांचा अवैध खाणकामाशी संबंध असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. (वृत्तसंस्था)आणखी दोन पोटनिवडणुकास्मृती इराणी यांनीही लोकसभेवर निवडून आल्यानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यसभेच्या आणखी दोन जागांसाठी गुजरातमध्ये निवडणूक व्हायची आहे. तेथे भाजपने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व जुगलभाई ठाकोर यांना उमेदवारी दिली आहे.तेथे काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र विधानसभेतील भाजपची सदस्य संख्या आणि त्या दोन वेगळ्या पोटनिवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे भाजपचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील.
लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान राज्यसभेवर बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 4:38 AM