आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘भारत जोडो’ या घोषणेने उदयपूरमधील काँग्रेसच्या नव संकल्प शिबिराचा समारोप झाला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसने आत्मचिंतन करण्यासाठी चिंतन शिबिर आयोजित केले होते. शिबिरात मांडण्यात आलेले सर्व ठराव संमत करण्यात आले असले, तरी काही प्रश्न अनुत्तरित आहेत.
काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत अजूनही स्पष्ट संदेश नाही. ऑगस्टमध्ये संघटनात्मक निवडणूक होईल, तेव्हा २०२४ मधील लोकसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल? हा संदेश उदयपूरमध्ये देण्यात काँग्रेस अपयशी ठरली.
यामागचे कारण हे की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडे पूर्णवेळ अध्यक्ष नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
पक्षाचे नेतृत्व कोण करणार? याबाबत चिंतन शिबिरात काँग्रेस जरुर संदेश देईल, अशी अपेक्षा होती. उदयपूरमध्ये या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. काँग्रेसने संघटना, कृषी, अर्थव्यवस्था, सामाजिक न्याय, आदी मुद्द्यांवर समित्या स्थापन करून या मुद्द्यांवर चर्चा करून ठराव संमत केले; परंतु, काँग्रेसला मते कशी मिळतील आणि काँग्रेस निवडणूक कशी जिंकेल, यासाठी एकही समिती स्थापन करण्यात आली नाही.ऑगस्टमध्ये काँग्रेस पाच वर्षांसाठी नवीन अध्यक्ष निवडणार आहे. तथापि, उदयपूर चिंतन शिबिराबाबत असे म्हणता येईल की, ऑपरेशन यशस्वी झाले; परंतु, रुग्ण दगावला.
नवा अध्यक्ष कोण?
- पक्षातील नेतृत्वाबाबत अजूनही स्पष्ट संदेश नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाच्या नेतृत्वात पक्ष लढणार आहे याबाबतचा संदेश पक्ष देऊ शकलेला नाही.
- २०१९ च्या निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाध्यक्ष आहेत.
- यावर्षी गुजरात आणि हिमाचलमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यात यश मिळविण्याचे आव्हान पक्षापुढे आहे.