नवी दिल्ली : संसदेत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवर संसदपटूंना लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे या वर्षापासून विशेष संसदीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकसभेच्या ५४३ व राज्यसभेच्या २४४ सदस्यांमधून आठ पुरस्कारांची निवड करण्यासाठी संसदीय कामकाजात क्रांतिकारी बदल घडवून आणणारे लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड मंडळाची स्थापना करण्यात आली असून, या मंडळाची पहिली बैठक दिल्लीत कॉन्स्टिट्युशन क्लबच्या सभागृहात सोमवारी झाली.शिवराज पाटील यांच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ संसद सदस्य मुरली मनोहर जोशी, मल्लिकार्जुन खरगे, शरद यादव, सीताराम येचुरी, लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप, इंडिया टीव्हीचे चेअरमन आणि एडिटर इन चीफ, ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, इंडिया टुडे ग्रुपचे सल्लागार संपादक पद्मश्री राजदीप सरदेसाई यांचा समावेश आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणून लोकमतचे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता काम पाहत आहेत. निवड मंडळाच्या पहिल्या बैठकीत लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी महाराष्ट्रातील लोकमत विधिमंडळ पुरस्कारांची सविस्तर माहिती समितीला दिली आणि प्रस्तावित संसदीय पुरस्कारांची संकल्पना मांडली. बैठकीत पुरस्कार निवडीच्या निकषांबाबत सविस्तर चर्चा झाली. सर्वच सदस्यांनी त्यात मोकळेपणाने आपली मते मांडली. प्राथमिक चर्चेनंतर पुरस्कारांबाबत जे सूत्र ठरविण्यात आले, त्याचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत. लोकमत संसदीय पुरस्कारांमध्ये लोकसभा व राज्यसभेत दीर्घकाळ संसदीय कामगिरी बजावलेल्या विद्यमान सदस्यांपैकी उभय सभागृहांतील दोन ज्येष्ठ सदस्यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. याखेरीज दोन्ही सभागृहांतील दोन उत्कृष्ट नवोदित खासदार, दोन उत्कृष्ट महिला खासदार तसेच उत्तम कामगिरी बजावणाऱ्या दोन सदस्यांची विशेष पुरस्कारांसाठी निवड हे मंडळ करेल. (विशेष प्रतिनिधी)>राष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण !लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित संसदीय पुरस्कार हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी उपस्थित राहावे, यासाठी शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीचे सदस्य या सर्वांना निमंत्रित करणार आहेत. पुरस्कार विजेत्यांची अंतिम निवड मंडळाने केल्यानंतर कार्यक्रमाच्या वेळी त्यांची नावे घोषित करण्यात येणार आहेत.
उत्कृष्ट संसदपटूंना लोकमत पुरस्कार
By admin | Published: February 28, 2017 5:30 AM