नवी दिल्ली - जल समृद्ध अभियानात सहभागी होत मोलाचे योगदान देऊन व्यापक प्रसिद्धी दिल्याबाबत भारत सरकारच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संसाधन मंत्रालयातर्फे आज दैनिक लोकमतला राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८ ने सन्मानित करण्यात आले.
केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारा हा पहिला पुरस्कार होता. प्रादेशिक भाषेतील सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र म्हणून सोमवारी मावळंकर सभागृहात केंद्रीय जल संसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकमतला गौरविण्यात आले. लोकमतचे समुह संपादक विजय बाविस्कर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. १ लाख ५० हजार रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
माध्यमांनी सर्वोत्तम काम केल्याबाबत त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आता माध्यमांनी ही अभियान म्हणून जल चळवळ पुढे न्यावी असे आवाहन ना. गडकरी यांनी केले. यावेळी केंद्रीय जल संसाधन राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सचिव यु.पी सिंह याशिवाय महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संभाजी पाटील निलंगेकर, राम कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.