आज दिल्लीमध्ये सुरू असलेल्या लोकमत नॅशनल कॉनक्लेव्हमध्ये सहभागी झालेले भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी हिंदू धर्म आणि सेक्युलॅरिझरम या विषयांवर आपलं मत मांडताना काँग्रेसवर घणाघाती टीका केली. तसेच काँग्रेसनं देशाला घटनात्मकदृष्ट्या अंशत: इस्लामिक देश बनवून ठेवलं होतं, होतं असा आरोप केला.
सुधांशू त्रिवेदी यांना हिंदू राष्ट्राच्या कल्पनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमचं सरकार आल्यापासून आम्ही या देशाला खऱ्या अर्थाने सेक्युलर देश बनवण्याचा प्रयत्न केला. याआधी काँग्रेसने आपल्या या देशाला घटनात्मकदृष्ट्या अंशत: इस्लामिक देश बनवून ठेवलं होता. माझ्या या बोलण्यावर जर कुणाला आक्षेप असेल तर त्यांनी पुरावे आणून द्यावेत. मला जगातील एक सेक्युलर देश दाखवा जिथे शरिया आणि सर्वोच्च न्यायालयात मदभेद झाले तर देशातील सत्ताधारी पक्ष संसदेत कायदा करून घटना बदलून शरियाला सर्वोच्च न्यायालयाला श्रेष्ठ ठरवतो. असा एक सेक्युलर देश दाखवा जिथे ट्रिपल तलाक, हलाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असतो, असा सवाल त्यांनी विचारला.
यावेळी सुधांशू त्रिवेदी यांनी कुंभमेळ्याचं उदाहरण देऊन, हिंदू धर्माची सर्वसमावेशकता अधोरेखित केली. ते म्हणाले की, कुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. त्यात हजारो परकीय पर्यटक येतात. कुठल्या अन्य धर्माच्या कार्यक्रमात इतर धर्माचे लोक जातात का. पण कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या कुणाला हिंदू व्हा, म्हणून सांगितलं जातं का? ही उदारतेची आणि महानतेची सर्वोच्चता आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, भारत हा जगातील असा एकमेव देश आहे जिथे जगातील सर्व धर्म नांदतात. पारशी धर्म त्याच्या उगमस्थानी संपला पण भारतात तो अस्तित्वात आहे. आज या धर्मातील अनेक लोक उद्योगपती आहेत. ज्यू लोकांवर जगात सगळीकडे अत्याचार झाले मात्र भारतात तसं झालं नाही. . इस्लाममध्ये ७२ फिरके आहेत. काही आहेत काही येतील, हे सर्व भारतात आहेत. तरीही या हिंदू संस्कृतीला सांप्रदायिक म्हणून अपमानित केलं जातं, ज्या संस्कृतीमुळे भारतच नाही तर इस्लाममधील बंधुभावही याच संस्कृतीमध्ये आहे. जगात भारत एकमेव देश आहे जिथे २० कोटी मुस्लिम आहेत पण मशिदीत बॉम्बस्फोट होत नाहीत. मात्र जिथे निजाम ए मुस्तफाचं राज्य येतं तिथे मशिदींमध्ये बॉम्बस्फोट होतात.