Lokmat National Conclave: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर भाष्य केले. 'भाजप आणि काँग्रेसशासित राज्यांमध्ये डिझेल-पेट्रोलमध्ये 15 रुपयांचा फरक आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी सरकारे व्हॅट कमी करत नाहीत. विरोधक फक्त रेवडी वाटण्यात व्यस्त आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल मोफत वाटून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करत आहेत,' अशी टीका त्यांनी केली.
पूर्वीच्या सरकारने कलम 356 चा वापर केलायावेळी त्यांनी काँग्रेवरही जोरदार टीका केली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीवर विश्वास करतात. जून 1975 मध्ये देश लॉक झाला होता. तेव्हा लोक बोलत नव्हते. काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांनी प्रेस आणि न्यायालये बंद पाडली होती. यापूर्वी असे सरकार होते ज्याने राज्य सरकारे बरखास्त करण्यासाठी आमच्या घटनेतील विशेष कलम 356 चा वापर केला.'
मोदींचेही कौतुक केले'राहुल गांधी यांच्या आजीने कलम 356 चा 50 वेळा वापर केला. आम्ही सत्तेत आहोत, मोदीजींनी मे 2014 पासून कधीही 356 चा वापर केला आहे का? मी उपस्थित सर्वांना प्रश्न विचारतोय. तुमच्यापैकी कोणाला वाटते की, आम्ही 356 चा वापर केला? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकशाहीवर विश्वास आहे. पंतप्रधानपदी विराजमान होण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे एका राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे,' असेही ते यावेळी म्हणाले.
राहुल गांधींवर बोचरी टीकाते पुढे म्हणाले की, 'भारत ही सर्वात मोठी, सर्वात जुनी आणि सर्वात मजबूत लोकशाही आहे. आपल्याकडे काही कॉमिक कॅरेक्टर आहेत, ज्यांना भारताबाहेर जाऊन भारतात सत्ताबदल घडवून आणण्यासाठी बाहेरील जगाचा हस्तक्षेप घ्यायचा आहे, कशासाठी?' असा खोचक सवालही त्यांनी यावेळी राहुल गांधींना उद्देशून केला.