Lokmat National Conclave: जे नेते भाजपात गेले ते लगेच 'पवित्र' झाले- सचिन पायलट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 12:17 PM2024-02-06T12:17:48+5:302024-02-06T12:19:04+5:30
Lokmat Parliamentary Awards 2023: 'धर्म आणि जातीत अडकलेली लोकशाही' या विषयावरही मांडले रोखठोक मत
Lokmat National Conclave: पाचवा ‘लोकमत संसदीय पुरस्कार' सोहळा आज दिल्लीत होत आहे. या सोहळ्यापूर्वी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'चे आयोजन करण्यात आले. या कॉन्क्लेव्ह दरम्यान 'धर्म आणि जातीत अडकलेली लोकशाही' या विषयावर विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपापली मते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन पायलट यांनी या विषयावर आपले मौल्यवान विचार मांडले. तसेच पक्षांतरासंबंधी रोखठोक भाष्य केले.
काँग्रेस सोडून भाजप व अन्य पक्षांत जाणाऱ्या नेत्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजपला विरोधक संपवायचे आहेत. सरकारी यंत्रणांमार्फत विरोधी पक्षनेत्यांचे चारित्र्यहनन करणे हा सध्या भाजपाचा अजेंडा असल्याचे दिसते. अशा वेळी भीती दाखवून विरोधी नेत्यांना आपल्या पक्षात घ्यायचा सपाटाच भाजपाने लावला आहे. त्यामुळे जो कोणी भाजपच्या विरोधात जाईल, त्याचावर संकटे येणं हे अटळ आहे. म्हणूनच लोक भाजपात जात आहेत आणि जे भाजपसोबत जात आहेत, ते अचानक निष्कलंक होताना दिसत आहेत.
आपल्या सहकाऱ्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर सचिन पायलट म्हणाले की, काही सहकाऱ्यांनी नाईलाजास्तव प्रवेश केला तर काहींनी आपली विचारसरणी बदलली. सरकारी यंत्रणांची आकडेवारी स्पष्टपणे सांगते की, ९५ टक्के खटले विरोधी नेत्यांवर नोंदवले गेले आहेत. मोदी सरकारने १० वर्षात काहीही केले नाही. भाजप भ्रष्टाचारावर काय करत आहे? कशाचीच चौकशी होताना दिसत नाही. नोकऱ्या आणि महागाई यावर पंतप्रधान मोदींकडे काहीही उत्तर नाही. पण सरकारी यंत्रणांचा वापर मात्र सर्रास केला जात आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीतील पराभव
"२५ मंत्र्यांपैकी १८ पराभूत झाले. त्यावेळीच काहींना काँग्रेसने तिकीट नाकारायला हवे होते. जनतेचा प्रश्न आम्ही नीट मांडू शकलो नाही हे मान्य आहे. परीक्षेचा पेपर फुटणे ही मोठी समस्या होती. अनेक मुद्दे जनतेसमोर नीट मांडले गेले नाहीत. या साऱ्या गोष्टींमध्ये आम्हाला सुधारणेला वाव आहे", असे ते राजस्थानमध्ये झालेल्या पराभवाबद्दल बोलताना म्हणाले.