Lokmat National Conclave: विश्वासार्ह आणि प्रतिष्ठेचा पाचवा ‘लोकमत’ संसदीय पुरस्कार वितरण सोहळा आज दिल्लीत होणार आहे. तत्पूर्वी, 'लोकमत' नॅशनल कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले असून 'धर्म आणि जातीत अडकलेली लोकशाही' या विषयावर विविध पक्षाचे महत्त्वाचे नेते यावर आपले मनोगत व्यक्त करत आहेत. या सोहळ्यात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन पायलट यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, धार्मिक श्रद्धा आणि त्यासंदर्भातील विषयांवर मत व्यक्त केले.
"भारत हा धार्मिक देश आहे. प्रत्येकाची स्वतःची विचारसरणी आणि श्रद्धा आहे. कोणत्याही धर्माचे पालन करणे हा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान असावा आणि दुसऱ्यांच्या धर्माचा आदर असावा. पण राज्य किंवा देश चालवत असताना धर्म आड येता कामा नये. निवडून आलेल्यांनी धर्म बाजूला ठेवायला हवे. राम मंदिर बनले याचा साऱ्यांनाच आनंद आहे. कारण ते न्यायालयाच्या निर्णयानंतर उभारण्यात आले आहे. पण त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कोणाला आमंत्रण द्यायचं, किती लोकांना बोलवायचं, कधी बोलवायचं हे तुम्ही ठरवणं योग्य नाही. त्यांनी पाहुण्यांचा ठराविक आकडा ठरवला होता आणि त्यात त्यांना हवे असलेले लोक बोलवले. मग उरलेले आम्ही सगळे रामभक्त नाही का? आम्ही लगेच नास्तिक झालो का?" असा रोखठोक सवाल सचिन पायलट यांनी केला. जर तुम्ही आमंत्रण करत आहात तर त्याचा अधिकार तुम्हाला कसा मिळाला? आम्ही केव्हा यायचं हे तुम्ही कसे ठरवता? असे ते म्हणाले.
"काँग्रेसची काही नेतेमंडळी राममंदिर सोहळ्याला जाऊ शकले नाहीत. पण देशात प्रत्येकाला हा अधिकार आहे की ज्या गोष्टीवर श्रद्धा आणि विश्वास आहे, त्यावर त्याने श्रद्धा ठेवावी. देव हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे यावर कोणीही मालकी हक्क सांगू शकत नाही. आज शेतकरी संघर्ष करत आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. भाजप आणि सरकारी यंत्रणा विरोधकांचे चारित्र्यहनन करतात. सर्व विरोधी नेत्यांना त्रास दिला जात आहे. १० वर्षात काय केले, भाजप भ्रष्टाचारावर काय करत आहे, कशाचीही चौकशी होत नाही आणि मोदीची कसलेही उत्तर देत नाहीत," अशा शब्दांत सचिन पायलट यांनी सडकून टीका केली.