नवी दिल्ली - भारतातील घटनात्मक संस्थांवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा केला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर भारतात मोठा राजकीय वाद पेटला आहे. तसेच त्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, भारतातील न्यायव्यवस्थेवर शंका घेणाऱ्या राहुल गांधींवर केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी टीका केली आहे. तसेच भारताची न्यायपालिका ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. जागतिक पातळीवर भारताच्या न्यायपालिकेचा आदराने उल्लेख केला जातो, असं रिजिजू यांनी ठणकावून सांगितलं आहे.
भारतातील न्यायव्यवस्थेसह सर्व घटनात्मक संस्थावर कब्जा केला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना किरेन रिजीजू म्हणाले की, खरं तर राहुल गांधी जे काही बोलले त्याबाबत प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. मात्र देशातून आणि देशाबाहेरून ज्याप्रकारे सामुहिक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ही बाब गंभीर बनली आहे. या माध्यमातून भारतातील लोकशाही आणि न्यायव्यवस्था यांची प्रतिमा भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या लोकांकडून सरकार काही प्रकरणांमध्ये न्यायपालिकेत हस्तक्षेप करण्याचा आणि न्यायव्यवस्थेवर अंकुश ठेवत आहे, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय न्यायव्यवस्था ही कॉम्प्रमाईज करते, सरकार न्यायपालिकेवर नियंत्रण आणू इच्छितेय असं म्हणताहेत, ते भारतीय न्यायव्यवस्थेला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण भारताची न्यायपालिका ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. जागतिक पातळीवर भारताच्या न्यायपालिकेचा आदराने उल्लेख केला जातो.
भारतीय न्यायपालिकेवर हल्ला करून, न्यायव्यवस्थेला कमी लेखून आपल्या व्यवस्थेला दुबळे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी एक डिझाइन तयार करण्यात आलं आहे. मला सर्व माहिती आहे. पण मी इथे सर्व काही बोलू शकत नाही, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.