Lokmat National Conclave: ईडी, सीबीआयच्या नावानं विरोधकांना धमकावलं जातं; प्रियांका चतुर्वेदी यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 01:23 PM2024-02-06T13:23:21+5:302024-02-06T13:27:53+5:30

Lokmat Parliamentary Awards 2023: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच १५० पेक्षा जास्त खासदारांचे निलंबन झाले हे योग्य होतं का?, ईडी, सीबीआय केवळ विरोधकांना टार्गेट करून दबावतंत्र वापरत आहेत असं प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं.

Lokmat National Conclave: Opposition threatened in the name of ED, CBI; Priyanka Chaturvedi target BJP | Lokmat National Conclave: ईडी, सीबीआयच्या नावानं विरोधकांना धमकावलं जातं; प्रियांका चतुर्वेदी यांचा घणाघात

Lokmat National Conclave: ईडी, सीबीआयच्या नावानं विरोधकांना धमकावलं जातं; प्रियांका चतुर्वेदी यांचा घणाघात

नवी दिल्ली - Lokmat Parliamentary Awards 2023 ( Marathi News ) सध्या देशात ईडी, सीबीआयच्या नावानं विरोधकांना धमकावलं जात आहे. तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज दडपला जात आहे. ९७ टक्के कारवाया या विरोधी पक्षातील नेत्यांवर केल्या जात आहेत. परंतु यातील गुन्हा सिद्ध होण्याचा दर २ ते ३ टक्केच आहे. अजित पवारांबाबत पंतप्रधान काय बोलले होते? ७० हजार कोटींचा घोटाळा करणारे नॅशनल करप्शन पार्टी असं विधान करतात. त्यानंतर ४८ तासांत अजित पवार भाजपासोबत जातात आणि सत्तेत सहभागी होतात असं सांगत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वैदी यांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला. 

सर्वाधिक विश्वसनीय आणि प्रतिष्ठित लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याचं यंदा ५ वं वर्ष आहे. दिल्लीत होणाऱ्या या सोहळ्यापूर्वी 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'चं आयोजन करण्यात आले आहे. त्यात 'धर्म आणि जातीत लोकशाही अडकलीय का' या विषयावर दिग्गज नेते विचारमंथन करत आहेत. या परिसंवादात शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच १५० पेक्षा जास्त खासदारांचे निलंबन झाले हे योग्य होतं का?, ईडी, सीबीआय केवळ विरोधकांना टार्गेट करून दबावतंत्र वापरत आहेत. सरकारला घेरत असून जनतेचे प्रश्न विचारत असू तेव्हा सरकारकडून कारवाया होतात. त्यातून लोकशाही धोक्यात येते. देशातील लोकशाही संपली आहे. विरोधकांना जेलमध्ये टाकलं जातंय. विरोधक त्यांचा राग व्यक्त करत असतील तर त्यांचे निलंबन केले जाते. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जेव्हा मी संसदेत जाते, एखादा प्रश्न विचारते. पंतप्रधान म्हणतात, मी भ्रष्टाचारांविरोधात आहेत. ईडी, सीबीआयच्या तपासात ४ पटीने वाढ झाली. पण जे जे सत्ता पक्षात जातायेत त्यांना क्लीनचीट देण्याचं काम कोण करतंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच गेली २ वर्ष मुंबई महापालिकेत निवडणूक झाली नाही. ५ राज्याच्या बजेट एवढे महापालिकेचे बजेट आहे. जे जे उद्धव ठाकरेंना सोडून जात आहेत त्या माजी नगरसेवकांना ५-५ कोटी फंडातून दिले जातात. आम्ही विरोधात आहोत म्हणून निधी दिला जात नाही. तुम्ही २ कोटी रोजगार देणार होता त्याचे काय झाले? अग्निवीरबाबत युवक आंदोलन करतायेत. महिला कुस्तीपटू विरोधात आंदोलन करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं सांगितले. पण शेतकऱ्यांविरोधात काळे कायदे आणले. त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवलं जाते. हे मुद्दे आम्ही संसदेत उपस्थित करायला गेलो तर आमचं निलंबन केले जाते असा आरोप प्रियांका चतुर्वेदी यांनी केला. 

दरम्यान, जे.पी नड्डा यांनी म्हटलं होतं, देशात केवळ एकमेव पक्ष राहिल तो म्हणजे भाजपा, याचा अर्थ देश हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. संसदेत काही लोक घुसखोरी करतायेत, जर त्यांच्या हातात बंदूक असती तर काय केले असते? मागील वेळी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा विरोधी पक्षाचं ऐकून सरकारनं उत्तर दिले होते. त्यावेळीही भाजपाचं सरकार होते आणि आजही त्यांचे सरकार आहे. संसदेत जर कुणी प्रश्न विचारले तर त्याला तुम्ही निलंबित करणार? सरकारने लोकशाहीचा आदर केला पाहिजे. सत्तेत असणाऱ्यांनी प्रत्येकाचे ऐकून घेतले पाहिजे. या सरकारला ३५ टक्के लोकांनी मतदान केले पण ६५ टक्के लोकांनी मतदान केले नाही. तुमचे कितीही बहुमत असले तरी लोकशाहीत विरोधकांचे ऐकले पाहिजे. विरोधी पक्षाचीही मोठी जबाबदारी असते. लोकांचे प्रश्न आम्ही संसदेत मांडू शकतो असंही चतुर्वैदी यांनी सांगितले. 

...तर आम्ही नक्कीच विजयी होऊ 

महाराष्ट्रात भाजपाविरोधी वातावरण आहे त्यामुळे एका लोकसभा मतदारसंघात खासदाराच्या निधनानंतरही पोटनिवडणूक घेतली जात नाही. भाजपा आणि मिंदे गटाला भीती वाटत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी यावर कुठलेही माध्यम चर्चा करत नाही. वर्ल्ड प्रेस फ्रिडम रॅकिंगमध्ये भारतचा नंबर घसरत आहे. वर्ल्ड हंगर इंडेक्स येते, त्यात देशाची रॅकिंग घसरत आहे. सातत्याने जागतिक संस्थांच्या सर्व्हेक्षणात देशाचा नंबर घसरत आहे. मग पंतप्रधानांची लोकप्रियता वाढतेय त्यावर चर्चा कशाला करावी? आम्हाला जनतेवर भरवसा आहे. देशातील परिस्थिती जनता पाहतेय. जे जे आश्वासन भाजपानं दिले होते. आता ते चारही घटक नव्या रुपाने आणले आहे. गरीब, युवा, नारीशक्ती, शेतकरी हेच २०१४ मध्ये सांगितले होते. जनतेच्या समस्या तशाच आहे. आम्ही जनतेला एकजूट होऊन चांगला पर्याय दिला तर नक्कीच आम्ही विजयी होऊ. मी जातीवर विश्वास ठेवत नाही असं पंतप्रधान बोलतात, पण मी ओबीसीतून येतो असंही त्यांनी म्हटलं मग जातीभेद कोण करतेय? तुमची सगळी रणनीती जातीव्यवस्थेवर आधारित आहे. नीतीश कुमारांना तुम्ही पलटूराम बोलत होता मात्र त्यांच्यासाठीच तुम्ही रेड कार्पेट टाकले असा टोला प्रियांका चतुर्वैदी यांनी भाजपाला लगावला. 

८० कोटी जनतेला मोफत अन्न देणं हेच सर्वात मोठे अपयश 

उद्धव ठाकरे राज्यभरात दौरे करतायेत, शरद पवार राज्यात फिरतायेत, राहुल गांधी दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतभर फिरतायेत. आम्ही लोकांमध्ये जातोय, लोकांचं ऐकतोय. लोकांच्या समस्या जाणून घेतोय. देशात अघोषित आणीबाणी आहे त्याला देशातील जनताच उलथवून लावणार आहे. देशातील अर्थव्यवस्था ही मोठी समस्या आहे. आज घरात तीन वेळचं जेवण आणण्यासाठी लढावं लागतंय. ८० कोटी जनतेला फुकट रेशन देण्यानं काय होणार, त्या ८० कोटी जनतेला सक्षम करणे हे सरकारचं काम आहे. परंतु १३० कोटी जनतेपैकी ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देणे हे सरकारचं सर्वात मोठे अपयश आहे अशी टीका प्रियांका चतुर्वैदी यांनी केली. 

कुणाचा तिरस्कार करणं हिंदू धर्मानं शिकवलं नाही 

२००४ ते २०१४ ची अर्थव्यवस्था आणि २०१४ ते २०२४ ची अर्थव्यवस्था याची तुलना केली तर तुम्हाला उत्तर मिळेल. २००८ च्या मंदीतही भारताला नुकसान झाले नव्हते. अर्थव्यवस्थेचा पाया २०१४ मध्ये रोवला नाही. भ्रष्टाचाराबद्दल जेवढे आरोप झाले त्यात किती सिद्ध झाले? १० वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. एक भारतीय म्हणून आणि राजकीय पक्षाची नेता म्हणून सुप्रीम कोर्टाने राम मंदिराबद्दल जो निर्णय दिला त्याचं आम्ही स्वागत करतो. दिल मे राम, हात मे काम हा आमच्या पक्षाचा नारा आहे. माझ्या हिंदुत्वावर तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही. हिंदू धर्माने कधी भेदभाव करायला शिकवला नाही. एकमेकांचा तिरस्कार करणे हा आपला धर्म शिकवत नाही. माझ्या हिंदू धर्मात हे शिकवले जात नाही. कुणाचे तिरस्कार करायला शिकवला नाही. देशातील ४ शंकराचार्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जे धर्म जाणतात, धर्माची रक्षा करतात, धर्माचा प्रचार करतात ते प्रश्न उपस्थित करतात मग राजकीय पक्षाचे काय घेऊन बसलात? असंही प्रियांका चतुर्वैदी यांनी म्हटलं. 

Web Title: Lokmat National Conclave: Opposition threatened in the name of ED, CBI; Priyanka Chaturvedi target BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.