Lokmat National Conclave: विश्वासार्ह आणि प्रतिष्ठेचा पाचवा 'लोकमत' संसदीय पुरस्कार वितरण सोहळा आज दिल्लीत पार पडत आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या आधी 'लोकमत' नॅशनल कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले असून 'धर्म आणि जातीत अडकलेली लोकशाही' या विषयावर विविध राजकीय पक्षातील महत्त्वाचे नेते यावर आपले मनोगत व्यक्त करत आहेत. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत केलेल्या भाषणाचा दाखला चतुर्वेदी यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले.
खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूपच आत्मविश्वास आहे. EVM ची काही सेटिंग तर नाही ना?. प्रियांका यांना 'लोकमत' नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की, पंतप्रधान लोकसभेत म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३७० जागांचा टप्पा पार करेल आणि एनडीए ४०० हून अधिक जागा जिंकेल.
चतुर्वेदींची भाजपावर टीका मोदींच्या लोकसभेतील भाषणावरून प्रियांका यांनी प्रश्न उपस्थित केले. "मोदींना खूपच आत्मविश्वास आहे. ईव्हीएमची सेटिंग तर झाली नाही ना? २०१४ मध्ये त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत का? २ कोटी नोकऱ्या देणार होते याचे काय झाले? महागाई किती कमी झाली? लोकसभा निवडणुकीत काय होईल हे जनता ठरवणार आहे. जनतेने १० वर्ष यांचे सरकार पाहिले आहे. देशाने आणीबाणी पाहिली आहे आणि इंदिरा गांधींचा पराभव देखील पाहिला आहे", असे त्यांनी नमूद केले.
'लोकमत' नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये विविध पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला, दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी मार्लेना, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन पायलट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी आदी नेते सहभागी झाले आहेत.