Lokmat National Conclave : भारत हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही? नेपाळ, पाकिस्तानचं उदाहरण देत दिग्विजय सिंह यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:26 PM2023-03-14T12:26:07+5:302023-03-14T12:27:16+5:30
Lokmat National Conclave : नेपाळ आणि पाकिस्तानचं उदाहरण देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं.
संविधानात हिंदू राष्ट्र आहे का? नेपाळमध्ये ९५ टक्के हिंदू आहेत. त्यांच्या संसदेनं आपल्याला हिंदू राष्ट्र नाही, तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र व्हावं हा विचार केला. तुम्ही इस्लामिक राष्ट्र पाकिस्तानची परिस्थिती पाहिली असेल. हा देश सर्वांचा आहे. इतकी विविधता तुम्हाला कुठे सापडणार नाही. अशा विविधतेच्या देशात हिंदू राष्ट्र शक्य नाही, हे देशाच्या हितासाठी योग्य नाही. सर्वांना समान अधिकार आणि संधी हा लोकशाहीचा आधार आहे, असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केलं. हिंदू राष्ट्राबद्दल त्यांना विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत पार पडणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्यानं 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. 'भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ' (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडत आहेत. यावेळ दिग्विजय सिंह यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीबद्दल दिग्विजय सिंह यांना सवाल करण्यात आला. “मी पक्षाच्या आदेशाचं पालन केलं. माझ्या एकाही वक्तव्यावर मला नोटीस देण्यात आली नाही. मी जे बोलतो, जे करतो ते पक्षविरोधी कधीच नसतं. मला जेव्हा समजलं मल्लिकार्जून जे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत, ते जर फॉर्म भरत असतील तर मी नकार दिला,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
सर्जिकल स्ट्राईकवरही स्पष्टीकरण
दिग्विजय सिंह यांनी यापूर्वी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली होती. “माझा प्रश्न लष्कराला नव्हता. त्यांना जे टार्गेट दिलं त्यांना स्ट्राईक केला. परंतु सर्जिकल स्ट्राईकवर पहिलं वक्तव्य अमित शाह यांचं आलं की आम्ही ३०० दहशतवादी मारले. सुषमा स्वराज यांचं वक्तव्य आलं की जिथे पॉप्युलेशन नव्हतं तिथं स्ट्राईक केला. अजित नाथ म्हणाले ४५० मारले. माझं म्हणणं फक्त सरकारला होतं. राजकारणात विचारांना स्वातंत्र्याला महत्त्व असतं.” असं ते म्हणाले. राहुल गांधींनी यापासून हात झाडले पण मी माझ्या वक्तव्यावर आजही कायम असल्याचे ते राजनाथ सिंह म्हणाले.
२०२४ चं व्हिजन काय?
“काँग्रेसनं यापूर्वीच्या निवडणुकीतही जी कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना सहा रुपये दिले जाणार असल्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं. रोजगारासाठी योजनेचाही आम्ही उल्लेख केला होता. आजच्यापेक्षा कमी महागाई २००४-१४ मध्ये होती. आर्थिक विकासही उत्तम होता. आम्ही महागाई, बेरोजगारी आणि गरीबांची आर्थिक स्थिती कशी सुधारू शकतो यावर आम्ही प्रयत्न करू,” असं ते म्हणाले.