नवी दिल्ली : लोकशाही व्यवस्था सक्षम करण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान गुरुवारी लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याद्वारे दिल्लीतील समारंभात करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लोकमत संसदीय जीवनगौरव पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी (लोकसभा) यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी म्हणाले, लोकमत संसदीय पुरस्कार समारंभ हा लोकशाहीशी निगडीत आहे. त्यामुळे या समारंभाच्या नियमांचे पालन मला करणे गरजेचे आहे. तसेच, संसदेच्या कार्यप्रणालीत आणि व्यवहारांमध्ये खूप बदल झाले आहेत. संसदेतील भाषा आणि संवाद सुद्धा बदलले आहे. संसदेच्या अनेक समित्या आहेत. मी संसदेचा सदस्य असताना काही समित्यांवर काम केले आहे.
दरम्यान, लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांनी भाग घेतला होता. यावेळी सर्वांनी वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलासपणे भाष्य केले.