नवी दिल्लीः पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला असला तरी लोकसभेची निवडणूक वेगळी आहे. देश कोण चालवणार याचं उत्तर नरेंद्र मोदी हेच आहे. त्यामुळे २०१९ ची निवडणूक आम्हीच जिंकू, असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचं महत्त्व, या विषयांवरील 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये प्रकाश जावडेकर यांनी मोदी सरकारच्या कामकाजाचा पाढा वाचला आणि मोदींची लोकप्रियता वाढल्याचंही ठामपणे सांगितलं. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये आमचा पराभव झाल्यानं विरोधकांना नवा हुरूप आला आहे.आता आम्हीही नव्या जोमाने लढू आणि जिंकू, असं जावडेकर यांनी सांगितलं. एखादा पक्ष संपला, नेता संपला, त्याचं मोल संपलं असं आम्ही कधीच मानत नाही. प्रत्येक पक्षाची ताकद असते, ती कमी-जास्त होत असते. त्यामुळे काँग्रेस संपला असं आम्ही कधीच म्हटलं नाही, मानलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पंचायत ते पार्लमेंट आम्हीच राज्य करू, हा अहंकार नसून आत्मविश्वास. काँग्रेसने केलंच ना. आम्ही सत्तेच्या उपभोगासाठी नाही, सेवेसाठी आहोत, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.