नवी दिल्लीः कुठल्याही प्रश्नाला अत्यंत मुद्देसूद उत्तरं देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निडरपणे नेमके, थेट प्रश्न विचारणारे ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा आज 'लोकमत'च्या व्यासपीठावर आमनेसामने येणार आहेत. लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड सोहळ्याचं हे दुसरं वर्षं आहे. देशहिताकरिता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या संसद सदस्यांना लोकमत पार्लमेंटरी अवॉर्डने सन्मानित केलं जातं. या पुरस्कार सोहळ्याचं औचित्य साधून आयोजित केलेल्या लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा घेणार आहेत. ही मुलाखत दुपारी ३.३० वाजता 'लोकमत'च्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहता येईल.
महाराष्ट्राचा राज्यकारभार समर्थपणे सांभाळून, निवडणूक प्रचाराची धुरा यशस्वीपणे पेलून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे तरुण-तडफदार 'पोस्टर बॉय' झाले आहेत. स्वच्छ प्रतिमेच्या अभ्यासू नेत्यांच्या पंक्तीत त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांना केंद्रात बोलावलं जाऊ शकतं अशी चर्चाही अधे-मधे होत असते. या पार्श्वभूमीवर, येत्या काळात देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेनं जाईल, भाजपाची त्यात काय भूमिका असेल, पाच राज्यांतील निकालांकडे भाजपा कसा पाहतो आणि लोकसभा निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होईल, याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं 'व्हिजन' आज ऐकायला मिळेल.
'आप की अदालत' या लोकप्रिय कार्यक्रमात रजत शर्मा यांनी देशभरातील रथी-महारथींच्या मुलाखती घेतल्या आहेत. प्रश्न विचारण्याची त्यांची शैली, नेत्यांना बोलतं करण्याची, हळूच टोमणा मारण्याची, त्यांच्याकडून नेमका मुद्दा काढून घेण्याची हातोटी यामुळे ते फडणवीस आणि त्यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगेल.
पी. चिदंबरम Vs. बरखा दत्त
'लोकमत कॉन्ल्केव्ह'मध्येच धडाकेबाज पत्रकार म्हणून देशाला परिचित असलेल्या बरखा दत्त या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची मुलाखत घेणार आहेत. त्यात, लोकसभा २०१९ या 'मिशन'कडे काँग्रेस कसं पाहतं, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची अर्थनीती, रिझर्व्ह बँकेतील घडामोडी, यावर चर्चा होईल. दुपारी ४.१५ वाजता ही मुलाखतही आपण 'लोकमत'च्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहू शकाल.
मुरली मनोहर जोशी, शरद पवार यांनी जीवनगौरव
दरम्यान, लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य शरद पवार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संसदीय लोकशाही बळकट करण्यासाठी या दोघांनी दिलेल्या योगदानामुळे लोकमत पार्लमेंट ज्युरी बोर्डाने त्यांची एकमताने निवड केली. हे दोघेही केंद्रीय मंत्रिमंडळात होते व प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी अनेक संसदीय समित्यांचे नेतृत्व केले होते.
English summary :The 'Lokmat Parliamentary Award' ceremony has been organized on Thursday, 13th October, to honor the veterans from political field who have contributed immensely to the strengthening of democracy of India. Union Home Minister Rajnath Singh, Commerce and Industry Minister Suresh Prabhu, Union Human Resource Development Minister Prakash Javadekar, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and former Union Minister Farooq Abdullah will be present in the award ceremony by Lokmat Media. 'Lokmat Parliamentary Award' will given by Vice President Venkaiah Naidu.