नवी दिल्ली : लोकशाही व्यवस्था सक्षम करण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान गुरुवारी लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याद्वारे करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लोकमत संसदीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी लोकमत संसदीय पुरस्कारातील जीवनगौरव पुरस्कार खासदार शरद पवार (राज्यसभा) व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी (लोकसभा) यांना प्रदान करण्यात आला. तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील भाजपा सदस्य निशिकांत दुबे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर, संसदेत संस्मरणीय कामकाज करणा-या श्रीमती कणिमोळी, हेमा मालिनी, श्रीमती रमा देवी, छाया वर्मा या महिला खासदारांनाही लोकमत संसदीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
याशिवाय, लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांनी भाग घेतला होता. यावेळी सर्वांनी वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलासपणे भाष्य केले.