Lokmat Parliamentary Awards: अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील; शशी थरुर यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 03:49 PM2019-12-10T15:49:07+5:302019-12-10T15:49:53+5:30
Lokmat Parliamentary Awards 2019 - देशाची आर्थिक स्थिती, रोजगार या सर्व पातळीवर केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यावरुन काँग्रेस नेते शशी थरुर यांनी अमित शहांवर टोला लगावला आहे. अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील. अमित शह कोणत्याही गोष्टीचं खापर काँग्रेस आणि नेहरुंवर फोडण्याचं काम करतात अशी टीका त्यांनी केली आहे.
लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात शशी थरुर बोलत होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होऊ शकत नाही, पंडित नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद यांनीही असा विचार कधीही केला नाही. १९३५ मध्ये हिंदू महासभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली तर १९४० मध्ये मुस्लीम लीगच्या जिना यांनी मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडली. काँग्रेस पक्षाने कधीही धर्माच्या आधारावर राजकारण केलं नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच देशाच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांचं महत्त्व असल्याचंही ते म्हणाले, भाजपा एकमेव पक्ष आहे ज्याचं राजकारण हिंदुत्व, हिंदू यावर सुरु आहे. काँग्रेसने देशातील प्रत्येक जाती-धर्माला सोबत घेण्याचं राजकारण केलं आहे. सध्या लोकसभेत १४५ खासदार हे प्रादेशिक पक्षाचे निवडून आले आहेत. ५३ प्रादेशिक पक्ष देशभरात आहेत. १० राज्यात प्रादेशिक पक्षांचे सरकार आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजपाने प्रादेशिक पक्षांशी आघाडी करत सत्ता स्थापन केली आहे. स्थानिक प्रादेशिक पक्षांची ताकद असते. राज्याच्या विकासासाठी प्रादेशिक पक्षाची भूमिका निर्णयाक ठरते. राष्ट्रीय पक्षाची भूमिका राष्ट्रहिताची असते पण प्रादेशिक पक्षांकडून राज्यातील जनतेचा कानोसा घेता येतो. हिंदी दाक्षिणात्य भागात स्वीकारली जात नाही त्यामुळे भाजपाला तिथे जास्त जागा घेत नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर देशाची आर्थिक स्थिती, रोजगार या सर्व पातळीवर केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. २०१४ मध्ये भाजपाने जी आश्वासने दिली ती त्यांना पूर्ण करता आली नाही. रोज नवीन नवीन समस्या सरकार देशासमोर उभं करत आहे असा आरोपही शशी थरुर यांनी केला.
लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार सर्वोत्कृष्ट खासदारांना लोकमत संसदीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या विजेत्यांची निवड केली. जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खासदार, सर्वोत्कृष्ट महिला खासदार, संसदेत पहिल्यांदा निवडून आलेली सर्वोत्कृष्ट महिला खासदार अशा चार श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात.
2017पासून या पुरस्कारांची सुरुवात झाली असून, 2018मध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एन. के. प्रेमचंद्रन, निशिकांत दुबे, सुष्मिता देव, रमादेवी, मीनाक्षी लेखी, हेमामालिनी यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पहिल्या वर्षी शरद पवार, सीताराम येचुरी, गुलाम नबी आझाद, जया बच्चन, कनिमोळी, रजनी पाटील, छाया वर्मा या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्यात ग्रामपंचायत, विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही आता पुरस्काराने गौरविले जाते.
पाहा व्हिडीओ -