नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचं मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे. ते लोकमतच्या संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. राष्ट्राच्या आधारावर आपण नागरिकत्वाचा कायदा बनवत आहोत. मौलाना अब्दुल कलाम आझाद म्हणाले होते की, मी एक हिंदुस्थानी मुसलमान आहे, माझं या राष्ट्राशी 1 हजार वर्षांचं जुनं नातं आहे, याची आठवणही ओवैसी यांनी करून दिली आहे. मुसलमान असल्यानं आमचा त्या विधेयकात समावेश नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
श्रीलंकेच्या तमीळ, नेपाळमधल्या मधेशी यांचा या विधेयकात समावेश नाही. चीनकडे भारताचा एक तृतीयांश भाग आहे. त्यामुळे या विधेयकात चीनचाही समावेश करा. बांगलादेशालाही तुम्हीच बनवलं. टायगर सिद्दिकी या माणसानं मुक्ती वाहिनी तयार केली. पुढे त्याच मुक्ती वाहिनीनं बांगलादेशाच्या निर्मितीस मदत केली. भारताच्या मुस्लिमांचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मुस्लिमांशी काहीही संबंध नाही. तुम्ही जिनांचे विचार पुन्हा जिवंत करत आहात, असा आरोपही ओवैसींनी केला आहे. बंगाली हिंदू आता सांगतील आम्ही भारतीय आहोत. एनआरसी करून सीएबी घेऊन याल, पण सीएबी हे आंबेडकर आणि गांधींच्या विरोधात आहे. प्रादेशिक पक्ष हे लोकशाहीसाठी चांगले आहेत. भाजपाला कोणत्याही विषयाचं देणं-घेणं नाही. महाराष्ट्रातही आमचे दोन आमदार आणि एक खासदार निवडून आलेले आहेत. आमचा राष्ट्रीय पक्ष नाही. इम्तियाज जलील शिवसेनेला हरवून खासदार झाले. इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नांमुळे दिल्ली-औरंगाबाद तीन विमानांची सेवा सुरू झाली. निवडणुकीदरम्यान पावसानं अनेक पिकांची नासधूस झाली, असे मुद्दे इम्तियाज जलील यांनी उचलून धरले. प्रादेशिक मुद्द्यांवर राष्ट्रीय पक्ष जास्त लक्ष देत नसल्याचंही ओवैसींनी अधोरेखित केलं आहे.