नवी दिल्लीः मोदी सरकारला नोकऱ्या उत्पन्न करण्यात आणि महागाई नियंत्रणात अपयश आलेलं आहे. त्यामुळेच जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा विधेयकासारखे इतर मुद्दे ते उपस्थित करत आहेत. देशातली बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मोदी सरकारनं दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन मोदी सरकार पूर्ण करू शकलेलं नाही. देशात नोकऱ्यांचा मोठा तुटवडा आहे, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात शशी थरूर बोलत होते. अमित शाह कोणत्याही गोष्टीचं खापर काँग्रेस आणि नेहरुंवर फोडण्याचं काम करतात अशी टीका त्यांनी केली आहे. अमित शाहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील. धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होऊ शकत नाही, पंडित नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद यांनीही असा विचार कधीही केला नाही. 1935मध्ये हिंदू महासभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली, तर 1940मध्ये मुस्लीम लीगच्या जिना यांनी मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडली. काँग्रेस पक्षाने कधीही धर्माच्या आधारावर राजकारण केलं नाही, असं त्यांनी सांगितले. त्याचबरोबर देशाची आर्थिक स्थिती, रोजगार या सर्व पातळीवर केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. 2014मध्ये भाजपाने जी आश्वासने दिली ती त्यांना पूर्ण करता आली नाही. रोज नवीन नवीन समस्या सरकार देशासमोर उभं करत आहे, असा आरोपही शशी थरूर यांनी केला.
Lokmat Parliamentary Awards : रोजगार, महागाईच्या मुद्द्यावर मोदी सरकार अपयशी - शशी थरूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 4:45 PM