Lokmat Parliamentary Awards 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील एका सभेत अजित पवार यांचे नाव घेऊन एनसीपीला पिंजऱ्यात उभे केले होते. पण आता पंतप्रधान मोदी सांगणार का की, तेच अजित पवार आज भाजपा आणि शिंदे गटासोबत महाराष्ट्रात सरकार चलवत आहेत. तर मग आज पंतप्रधानांनी अजित पवारांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप संपले आहेत का? असा सवाल शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे. यावेळी त्यांनी इतरही काही मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.
सर्वाधिक विश्वसनीय आणि प्रतिष्ठेचा लोकमत संसदीय पुरस्कार सोहळा आज दिल्ली येथे पार पडत आहे. हे या सोहळ्याचे 5 वे वर्ष आहे. 'लोकमत' संसदीय पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 'लोकमत' नॅशनल कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते 'धर्म आणि जातीमध्ये अडकलेली लोकशाही' या विषयावर आपापली मते व्यक्त करत आहेत. या वेळी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही काही विषयांवर आपले मत मांडले.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "भ्रष्टाचारासंदर्भात सरकार आणि सरकार चालवणाऱ्या भाजपची दुहेरी भूमिका आहे. भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावर आरोप आहेत, मात्र तेच नेते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत हल्ला चढवत आहेत. आजच्या काळात भाजप आणि पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराबाबत सखोल आत्म मंथन करण्याची आवश्यकता आहे."
लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार -"देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 150 हून अधिक खासदारांचे निलंबन झाले. हे योग्य होते का? ईडी, सीबीआय केवळ विरोधकांना टार्गेट करून दबावतंत्राचा वापर करत आहे. देशातील लोकशाही संपली आहे. विरोधकांना जेलमध्ये टाकले जाते आहे. विरोधक त्यांचा राग व्यक्त करत असतील तर त्यांचे निलंबन केले जाते. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जेव्हा मी संसदेत जाते, एखादा प्रश्न विचारते. पंतप्रधान म्हणतात, मी भ्रष्टाचारांविरोधात आहेत. ईडी, सीबीआयच्या तपासात 4 पटीने वाढ झाली. पण जे जे सत्ता पक्षात जातायेत त्यांना क्लीनचीट देण्याचे काम कोण करत आहे? असा सवाल यावेळी चतुर्वेदी यांनी केला.