नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या निवडक आठ खासदारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने लोकमत संसदीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. लोकमत संसदीय पुरस्कार २०१९ हा सोहळा उद्या, मंगळवारी दिल्लीच्या जनपथ येथील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये संध्याकाळी सात वाजता होणार आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार सर्वोत्कृष्ट खासदारांना हा पुरस्कार देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या विजेत्यांची निवड केली. जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खासदार, सर्वोत्कृष्ट महिला खासदार, संसदेत पहिल्यांदा निवडून आलेली सर्वोत्कृष्ट महिला खासदार अशा चार श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात.
सोहळ्याआधी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या भीम सभागृहात ‘राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात काँग्रेसचे खासदार शशी थरूर, असादुद्दीन ओवेसी, केंद्रीय मंत्री पियूष गोयल सहभागी होतील. २०१७ सालापासून या पुरस्कारांची सुरुवात झाली. २०१८मध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, एन. के. प्रेमचंद्रन, निशीकांत दुबे, सुष्मिता देव, रमादेवी, मीनाक्षी लेखी, हेमामालिनी यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
पहिल्या वर्षी शरद पवार, सीताराम येचुरी, गुलाम नबी आझाद, जया बच्चन, कनिमोळी, रजनी पाटील, छाया वर्मा या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांची मूळ संकल्पना लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांची आहे. पुढे या संकल्पनेचा विस्तार झाला. राज्यात ग्रामपंचायत, विधीमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाºया लोकप्रतिनिधींनाही आता पुरस्काराने गोरविले जाते.