नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निवडक आठ खासदारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीनं लोकमत संसदीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. लोकमत संसदीय पुरस्कार २०१९ हा सोहळा दिल्लीतल्या जनपथ येथील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये संपन्न होत आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.
लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार सर्वोत्कृष्ट खासदारांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं या विजेत्यांची निवड केली. जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खासदार, सर्वोत्कृष्ट महिला खासदार, संसदेत पहिल्यांदा निवडून आलेली सर्वोत्कृष्ट महिला खासदार अशा चार श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात.