नवी दिल्ली-
देश चालवण्यात संसदेचं योगदान खूप महत्वाचं असतं आणि यात हजारो सहकाऱ्यांनी योगदान व सेवा दिली आहे. या सर्व सहकाऱ्यांमधून उत्तम खासदारांची निवड करणं काही सोपं काम नाही. पण या पुरस्कारामुळे खासदारांनाही चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. आपणंही असं काम करावं की आपलीही पुरस्कारासाठी निवड व्हावी अशी प्रेरणा यातून खासदारांना मिळते असा मला विश्वास आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते नवी दिल्लीत आयोजित लोकमत संसदीय पुरस्कार २०२२ सोहळ्यात बोलत होते.
दिल्लीत आज दिग्गजांच्या उपस्थितीत लोकमत संसदीय पुरस्कारांचं वितरण केलं जात आहे. या पुरस्कारांची निवड करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली होती. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात संसदेचं आणि अशा पुरस्कारांचं महत्व पटवून दिलं.
"भारत देशाचं एक वैशिष्ट्य मला आवर्जुन सांगावसं वाटतं की देश चालवण्यात सर्वात महत्वाची भूमिका संसदेची असते. आजवर हजारो सहकाऱ्यांनी यात योगदान आणि देशाप्रती सेवा अर्पित केली आहे. माझ्यामते प्रत्येक खासदार त्याचं उत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मी खरंच सांगतो या सगळ्यांमधून चांगले संसदपटू निवडणं हे सोपं काम नव्हतं. मला एक गोष्ट सांगण्यात आनंद वाटतो की माझ्यासोबत या समितीमध्ये असलेले दिग्गजांमुळे निवड करण्यात खूप मदत झाली. असे पुरस्कार खासदारांना देणंही मला गरजेचं वाटतं. कारण यातून खासदारांना चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. आपलंही नाव या पुरस्कारासाठी विचारात घेतलं जावं अशी आशा निर्माण होते आणि त्यादृष्टीनं काम सदस्य करू शकतात", असं शरद पवार म्हणाले.
स्वातंत्र्याचा अर्थ जवाहरलाल दर्डांनी सांगितलाशरद पवार यांनी यावेळी लोकमत समूहाचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्याही आठवणींना उजाळा दिला. "जवाहरलाल दर्डा हे माझे सहकारी होते आणि उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. ते स्वातंत्र्यसेनानी होते. स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना उमगला होता. स्वातंत्र्यानं लोकांच्या जीवनात काय फरक पडेल याकडे त्यांचं लक्ष असायचं. ते उत्तम पत्राकार होते. त्यामुळेच त्यांनी लोकमतची सुरुवात केली", असं शरद पवार म्हणाले.