Lokmat Parliamentary Awards: मोदींच्या अनेक मंत्र्यांकडेच जन्मदाखला नाही; थरुर यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 04:41 PM2019-12-10T16:41:09+5:302019-12-10T17:38:53+5:30
Lokmat Parliamentary Awards 2019 : नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन थरुर यांची मोदी सरकारवर जोरदार टीका
नवी दिल्ली: देशभरात गाजत असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुनकाँग्रेस नेते शशी थरुर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलताना थरुर यांनी लोकसभेत संमत झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावर भाष्य केलं. मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेकांना ते नेमके कुठले आहेत, हेच सिद्ध करता आलेलं नाही, अशी टीका करताना थरुर यांनी माजी लष्करप्रमुख आणि भाजपा नेते व्ही. के. सिंह यांचं नाव घेतलं.
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन थरुर यांनी थेट मोदी सरकारवर शरसंधान साधलं. 'मोदींचे मंत्री असलेल्या सिंह यांनी एक याचिकादेखील दाखल केली आहे. जन्म दाखला आणि अधिकृत कागदपत्रांवरील जन्म तारीख वेगळी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्याकडे जुनी कागदपत्रं नीट जपून ठेवली जात नाहीत. देशातील अनेक भागांमध्ये ही समस्या भेडसावते. कित्येकांकडे जन्म दाखले नसतात,' असं थरुर म्हणाले.
शशी थरुर यांनी यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहांना जोरदार टोला लगावला. शहा कायम प्रत्येक समस्येसाठी काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरतात. अमित शहा प्रत्येक प्रश्नाला काँग्रेस आणि नेहरुंशी जोडतात. त्यामुळे त्यांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील, असा चिमटा त्यांनी काढला. धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होऊ शकत नाही, पंडित नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद यांनीही असा विचार कधीही केला नाही. १९३५ मध्ये हिंदू महासभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली, तर १९४० मध्ये मुस्लीम लीगच्या जिना यांनी मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडली. काँग्रेस पक्षानं कधीही धर्माच्या आधारावर राजकारण केलं नाही असं त्यांनी सांगितलं.