Lokmat Parliamentary Awards: खराब अर्थव्यवस्था वारशानं मिळालीय; गोयल यांचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 09:08 PM2019-12-10T21:08:22+5:302019-12-10T21:17:39+5:30

काँग्रेससोबत शिवसेनेदेखील घणाघाती टीका

Lokmat Parliamentary Awards railway minister piyush goyal hits out congress over economy | Lokmat Parliamentary Awards: खराब अर्थव्यवस्था वारशानं मिळालीय; गोयल यांचा काँग्रेसवर निशाणा

Lokmat Parliamentary Awards: खराब अर्थव्यवस्था वारशानं मिळालीय; गोयल यांचा काँग्रेसवर निशाणा

Next

नवी दिल्ली: आम्हाला खराब अर्थव्यवस्था वारशानं मिळाली. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य उज्ज्वल असल्याचं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावर भाष्य करताना देशाच्या अर्थव्यवस्थेला लवकरच अच्छे दिन येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. 

गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या जीडीपी वाढीचा दर सातत्यानं घसरत आहे. त्याबद्दल पीयूष गोयल यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना गोयल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. 2014 मध्ये आम्ही सत्तेत आलो. तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट स्थितीत होती. अडचणीत असलेली अर्थव्यवस्था आम्हाला वारशानं मिळाली आहे. अर्थव्यवस्था सक्षम करण्याचं काम आम्ही केलं असून आज भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढते आहे, असं गोयल यांनी सांगितलं. 

रेल्वेची अवस्था अतिशय बिकट असल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. त्यावरही गोयल यांनी भाष्य केलं. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानं रेल्वेवर 22 हजार कोटींचा बोजा पडला आहे. प्रवाशांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेत केली जाणारी गुंतवणूक दीडपटीनं वाढली आहे. मोफत वायफाय सेवा दिली जात आहे. याशिवाय सुरक्षेवर केला जाणारा खर्चदेखील वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 
 



पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रात झालेल्या घडामोडींवरुन शिवसेनेला धारेवर धरलं. आम्ही युती म्हणून लढलेल्या 288 पैकी 164 जागा जिंकलो. भाजपानं 164 जागा लढवून 105 जागांवर विजय मिळवला. याचा अर्थ आम्ही लढवलेल्या 65 ते 70 टक्के जागा जिंकल्या. जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला. पण शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही. जर भाजपानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवल्या असत्या, तर आमचं सरकार नक्कीच आलं असतं. शिवसेना शत्रूच्या गोटात जाऊन सामील झाली. शिवसेनेनं सर्वच सिद्धांत मोडीत काढले. शिवसेना कालपर्यंत ज्यांच्यावर टीका करत होती, त्यांच्यासोबतच जाऊन बसली आहे, अशी घणाघाती टीका गोयल यांनी केली.

Web Title: Lokmat Parliamentary Awards railway minister piyush goyal hits out congress over economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.