अमृता कदम नवी दिल्ली : मार्च २०१९पर्यंत ८० टक्के गंगा शुद्ध होईल, असे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. ‘लोकमत-सखी मंच’च्या भगिनींशी गुरुवारी संवाद साधताना गडकरी यांनी गंगा शुद्धीकरण प्रकल्पाविषयी माहिती दिली.‘लोकमत-सखी मंच’तर्फे ५१ सखींना दिल्ली हवाई सफर घडविण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या या सखींना दिल्लीदर्शनाबरोबरच नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाण्याची संधी मिळाली. गडकरींकडे सोपविण्यात आलेल्या गंगा शुद्धीकरण खात्यातील कामांविषयी सखींनी उत्सुकतेने प्रश्न विचारले.गंगेच्या प्रदूषणामध्ये ७० टक्के वाटा असलेल्या दहा मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित केले असून ते रोखण्यासाठी १८९ प्रकल्पांचेनियोजन केले आहे. गंगेच्या काठावरील ४५०० गावे ‘गंगाग्राम’ म्हणून विकसित होणार आहेत. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट यांची मदत घेणार आहोत, असे सांगून गडकरी यांनी गंगेद्वारे पर्यटन, रोजगाराला चालना देण्याचा मानसही व्यक्त केला.या सखींनी दिल्ली दर्शनाचाही आनंद लुटला. २०१७मध्ये ‘सखी मंच’च्या सभासद झालेल्या अडीच लाख सदस्यांपैकी ५१ भाग्यशाली विजेत्या सखींना ही सफर घडविण्यात आली. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन, इंडिया गेट, राजपथ, नॉर्थ ब्लॉक-साऊथ ब्लॉक अशा ल्युटन्स दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना सर्व सखींनी भेट दिली.या सखींसोबत नाशिक ‘लोकमत’चे उपाध्यक्ष बी.बी. चांडक, नागपूर ‘लोकमत’चे इव्हेन्ट हेड नितीन नौकरकर, संखी मंच नागपूरच्या संयोजिका नेहा जोशी, मुंबईचे राघवेंद्र शेट, तनुजा भालेराव, नूतन शिंदे हेही होते.काय आहे ‘लोकमत - सखी मंच’? : महिलांच्या अभिव्यक्ती व विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ज्योत्सना दर्डा यांनी २००० साली ‘लोकमत-सखी मंच’ची सुरुवात केली.१७ वर्षांमध्ये ‘सखी मंच’ महाराष्ट्रामधील महिलांसाठीचे सर्वांत मोठे व्यासपीठ ठरला आहे. ‘सखी मंच’ची राज्यात शंभरहून अधिक केंद्रे आहेत. सखी सम्राज्ञी, संक्रांत मेळावा, कौशल्य विकासासाठी कार्यशाळा, दर्जेदार मराठी नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम ‘सखी मंच’तर्फे आयोजित केले जातात.क्लीन गंगा मिशनसाठी एक कोटी लोकांकडून देणगी घेण्याचे लक्ष्य असल्याचे सांगताना, त्यात ‘लोकमत - सखी मंच’ने हातभार लावावा, असे आवाहन गडकरींनी केले. हा संदेश आपल्या मित्रमंडळी, नातेवाइकांपर्यंत पोहोचवावा, असेही गडकरी म्हणाले. या मिशनसाठी देणगी चेकने स्वीकारली जाईल आणि डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून संबंधित विभागांपर्यंत पोहोचवली जाईल.
लोकमत ‘सखी मंच’च्या विजेत्यांची दिल्ली हवाई सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:25 AM