LokSabha BJP Candidate List: भाजप नेते आणि भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांना पक्षाने आसनसोलमधून लोकसभेची उमेदवारी दिली होती. पण, अचानक त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर आता इतर पक्षांनी त्यांना ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. RJD ने त्यांना आरा किंवा वैशाली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. तर दिल्लीतील आम आदमी पक्षाने त्यांना दिल्लीत मनोज तिवारी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे.
भारतीय जनता पक्षाने 2 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात पवन सिंह यांचेही नाव होते. उमेदवारी मिळाल्यानंतर सुरुवातीला पवन सिंह यांनी आनंद व्यक्त केला, पण दुसऱ्याच दिवशी(3 मार्च) आसनसोलमधून निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना दिल्लीत बोलावले. आज पवन सिंह यांनी पक्षप्रमुखांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले.
जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर पवन सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, मला जे काही सांगायचे होते ते त्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. पुढे जे होईल ते चांगले होईल. दरम्यान, आम आदमी पार्टीकडून ऑफर मिळल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले.