नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह उफळून आला आहे. पंजाबमधील खराब कामगिरीसाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना जबाबदार ठरवले आहे. तसेच सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे पक्षाला फटका बसल्याचा दावा अमरिंदर सिंग यांनी केला.
काँग्रेसनेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी इमरान खान यांच्या शपथ विधीला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी पाकिस्तान सेनेचे अध्यक्ष कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली होती. त्या मुद्दावरून अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्यावर निशाना साधला. पाकिस्तान सेना प्रमुखाची गळाभेट घेणे भारतीयांना रुचत नाही, असंही अमरिंदर सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी सनी देओलविरुद्ध गुरुदासपूरमधून सुनील जाखड यांच्या पराभवावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच येथील लोकांनी अनुभवी नेत्याला सोडून अभिनेत्याला का निवडले, असा प्रश्न आपल्याला पडल्याचे नमूद केले.
दरम्यान काँग्रेसने उत्तर भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत पंजाबमध्ये चांगली कामगिरी केली आहे. येथील १३ पैकी ८ जागांवर काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. तर भाजप दोन जागांवर आघाडीवर आहे. तर गेल्यावेळी चार जागा जिंकणारा आम आदमी पक्ष केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.