नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील 'वर्ड वॉर' आणखीच पेटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शाब्दीक चकमक थांबायचे नाव घेत नाही. जय श्रीरामच्या घोषणेवरून मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ममता म्हणाल्या की, मोदी हे दुर्योधन आणि रावनाचा अवतार आहे. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते, असंही ममता यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींनी एका सभेत म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम बोलणाऱ्यांना अटक करण्यात येते. राज्यात देवाचं नाव घेण्यास बंदी आहे. त्यावर ममता यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदी पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर म्हणतात, तृणमूल काँग्रेस गुंडांचा पक्ष आहे. त्याचवेळी मनात आले की, मोदींनी जोरदार चपराक ठेवून द्यावी. मोदींना त्याची गरज आहे. आजपर्यंत असा खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही. निवडणुका आल्या की यांना राम आठवतो, अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि नोटबंदी केली, अशी घणाघाती टीका ममता यांनी केली.
मी स्वत:ला विकून राजकारण करत नाही. आपण कुणालाही घाबरत नसून निडरतेने जगते. मोदी केवळ दंगे भडकवण्यात आग्रेसर आहेत. धर्माच्या नावावर जनतेत फूट पाडत असल्याची टीका देखील ममता यांनी मोदींवर केली.
जय श्री राम हा भाजपचा नारा आहे. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने हा नारा द्यावा. निवडणुका आल्यावर प्रभू रामचंद्र भाजपचे आणि नरेंद्र मोदींचे एजंट होतात, का असा सवालही ममता यांनी उपस्थित केला.