चंदौली - उत्तर प्रदेशातील चांदौली येथील तारा जीवनपूर गावातल्या काही मतदारांनी जबरदस्तीने हाताला शाई लावल्याचा आरोप केला आहे. तीन माणसांनी त्यांना शनिवारी 500 रुपयांचे आमिष दाखवलं होतं. तसेच भाजपाला मत देण्याबद्दल सांगितल्याचा आरोप या मतदारांनी केला आहे. तसेच जबरदस्ती शाई लावण्यासोबतच मतदाराच्या हातात 500 रुपयेही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदौली लोकसभा क्षेत्रातील तारा जीवनपूर गावातील नागरिकांनी भाजपा कार्यकर्त्यांवर मत न देण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. मत देण्यासाठी आम्हाला केवळ पैसेच दिले नाहीत तर मतदान करू नये म्हणून बोटाला शाई देखील लावण्यात आल्याचं नागरिकांनी सांगितलं. तीन माणसांनी त्यांना शनिवारी 500 रुपयांचे आमिष दाखवलं होतं. कोणाला याबद्दल सांगू नका असे म्हणत पाचशे रुपये दिल्याचा आरोपही लोकांनी केला आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. तसेच तक्रारदारांनी मतदानाच्या आधीच जबरदस्तीने हाताच्या बोटावर शाई लावण्यात आली तसेच 500 रुपये देण्यात आल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी रविवारी (19 मे)मतदान होत आहे. मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून, कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी हे मतदान होत आहे. 918 उमेदवार त्यासाठी रिंगणात असून सुमारे 10 कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
सातव्या टप्प्यामध्ये बिहार (8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (3), मध्य प्रदेश (8), पंजाब (13), उत्तर प्रदेश (13), पश्चिम बंगाल (9) या राज्यांसह चंदीगड (1) या केंद्रशासित प्रदेशामध्येही मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसप आघाडीच्या शालिनी यादव यांनी आव्हान दिले आहे. मतदान आटोपताच विविध वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष दाखवण्यास सुरुवात होईल. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडेच असेल. राजकीय नेते त्यावर आपली मते व्यक्त करतील. पण २३ मे रोजी प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत राजकीय पक्ष, त्यांचे नेते व प्रत्यक्ष उमेदवार यांच्या मनात प्रचंड धाकधूक असेल.