संजय शर्मानवी दिल्ली : पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानाची दखल घेत भाजपने प्रचाराच्या रणनीतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच स्थानिक मुद्द्यांवर भर देत प्रचार अधिक धारदार व प्रभावी करण्यात येणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५ ते १०% मतदान वाढवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात ६३ टक्क्यांहून कमी मतदान झाल्याने गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व वरिष्ठ नेते आणि निवडणूक प्रभारी यांची बैठक बोलावली होती. यावेळी सर्व राज्यांतील परिस्थितींचा आढावा घेण्यात आला.
सत्तेत येण्यासाठी हवे ६६ टक्के मतदान २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आला तेव्हा ६६ टक्के मतदान झाले होते आणि भाजपने २८४ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये भाजप दुसऱ्यांदा सत्तेत परतला तेव्हा ६७.४० टक्के मतदान झाले आणि भाजपने ३०३ जागा जिंकल्या. म्हणजे किमान ६६ टक्के मतदान झाल्यास, भाजपचे सरकार स्थापन होते.
पहिल्या फेरीत केवळ ६३ टक्के मतदान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही चिंतेत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश देण्याचे भाजप नेत्यांना सांगितले आहे. तसेच लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यास कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
बूथस्तरावर मतदान वाढवा
भाजप नेत्यांच्या बैठकीत अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी सर्व नेत्यांना कठोर शब्दांत इशारा दिला की, बूथ स्तरावर कार्यकर्त्यांना सक्रिय करा. त्यासाठी प्रत्येक बूथवर पाच ते दहा टक्के मतदान वाढवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पुढील सव्वा महिना सर्वांनाच युद्धस्तरावर काम करावे लागेल. भाजपचे सर्व नेते, राष्ट्रीय सरचिटणीस, ज्येष्ठ नेते आणि निवडणूक प्रभारी यांच्यावर मतदानाची टक्केवारी वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर वॉररूम भाजप नेत्यांच्या बैठकीत निवडणूक प्रचाराचाही आढावा घेण्यात आला. निवडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यांचा फारसा परिणाम होत नाही, त्यामुळे आता भाजप स्थानिक प्रश्नही निवडणुकीत मांडणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मुद्दे निश्चित करणे आणि विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वॉर रूम सुरू करण्यात येणार आहे.