Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे, भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 400 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. हे लक्ष्य 2019 मध्ये भाजपला मिळालेल्या 303 जागांपेक्षा खूप जास्त आहे. विशेष म्हणजे, हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपने तीन नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला. याअंतर्गत त्यांनी त्रिसदस्यीय पथक नेमले. या तीन नेत्यांमध्ये सुनील बन्सल, विनोद तावडे आणि तरुण चुग यांचा समावेश आहे. हे तिन्ही नेते पक्षाचे सरचिटणीस आहेत. ही टीम 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांसाठी रणनीतींवर काम करेल. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जागा ओळखण्याचीही त्यांची भूमिका असेल. या टीमवर उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारीदेखील असेल.
विनोद तावडेतीन सदस्यीय पथकात विनोद तावडे यांचे नाव असून, ही जबाबदारी त्यांच्यासाठी पुनरागमन मानले जात आहे. भाजपचे सरचिटणीस तावडे 2014-2019 काळात सक्रीय राजकारणातून बाजूला होत गेले. पण, नंतर भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी दिली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये तावडे यांच्याकडे शालेय शिक्षण, वैद्यकीय आणि उच्च तंत्रशिक्षण, क्रीडा, संस्कृती आणि मराठी भाषा अशी महत्त्वाची खाती होती. पण 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत तावडे यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यावेळी तावडे शांत राहिले आणि पक्षातील निष्ठावंतांप्रमाणे भाजप उमेदवार सुनील राणे यांच्यासाठी काम केले. यानंतर पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी दिली. विनोद तावडे यांनी RSS संलग्न ABVP मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे ते अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्षही झाले.
सुनील बन्सल
सुनील बन्सल यांना त्रिसदस्यीय संघात स्थान मिळण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे निवडणूक व्यवस्थापन कौशल्य आणि भाजप नेतृत्वाचा त्यांच्यावर असलेला विश्वास. बन्सल यांनी गेल्या अनेक महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये भाजपसाठी रणनीती आखून पक्षाला मोठा विजय मिळवून दिला. 2017 आणि 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुका असोत किंवा 2019 च्या लोकसभा निवडणुका, पडद्याआड राहून भाजपला मोठा विजय मिळवून देण्याचे श्रेय सुनील बन्सल यांना जाते. या निवडणुकांमध्ये त्यांच्या रणनीतीपुढे भाजपला एकतर्फी विजय मिळाला. त्यांची पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणाचे प्रभारी राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही तीन अशी राज्ये आहेत, जिथे सध्या भाजपचे सरकार नाही. राजस्थानचे असलेले 53 वर्षीय सुनील बन्सल यांची RSS ची पार्श्वभूमी आहे आणि ते विद्यार्थी जीवनापासूनच संघाच्या संपर्कात आहेत.
तरुण चुग
तरुण चुग हे आणखी एक भाजप नेते आहेत, ज्यांनी ABVP मधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर पक्षासाठी एक महत्त्वाचा नेता बनले. अमृतसरचे राहणारे 50 वर्षीय तरुण चुग हे 2020 पासून भाजपचे सरचिटणीस आणि तेलंगणाचे प्रभारी आहेत. त्यांच्या नेतृत्वात बंडी संजय कुमार यांच्या नेतृत्वाखालील राज्य भाजप युनिटने सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) चे प्रमुख नेते एटाला राजेंद्र यांना सामील करून आपल्या रणनीतीची ताकद दाखवली. पक्षाने पोटनिवडणुकीत विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या आणि डिसेंबर 2020 मध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीतही चमकदार कामगिरी केली. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, चुग यांनी पदभार स्वीकारल्यापासून तेलंगणा भाजप युनिट देशातील इतर युनिट्सपेक्षा अधिक सक्रिय झाले आहे.