नवी दिल्ली - Narendra Modi Rally ( Marathi News ) यंदा लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पूर्ण होत आहेत. निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी घोषित होतील. १६ मार्चला लोकसभा निवडणुकीच्या घोषणेसह आचारसंहिता लागू झाली होती. अशावेळी प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात ताकदीनं उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच देशातील जवळपास सर्व राज्यात मॅरोथॉन दौरा केला होता.
परंतु निवडणुकीच्या घोषणेनंतर देशाच्या दक्षिणेकडील राज्यातून सुरु झालेली त्यांची प्रचार मोहीम अखेर पंजाबमधील होशियारपूर येथे संपली. ज्याठिकाणी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका निवडणूक रॅलीला संबोधित केले. या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी अनेक राज्यात दौरे करत प्रचार रॅली घेतल्या. विरोधी इंडिया आघाडीकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार, अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेते भाजपाविरोधात आक्रमक होते. तिथे मोदीही प्रत्येक ठिकाणी जात विरोधकांच्या टीकेला पलटवार करत होते.
आंध्र प्रदेशच्या पालनाडू येथे निवडणूक प्रचाराची सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही मोहीम ३० मे रोजी पंजाबच्या होशियारपूर येथे संपवली. या ७५ दिवसांच्या काळात पंतप्रधान मोदींनी १८० रॅली आणि रोड शो केले. पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीसह रोड शो आणि अन्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा आकडा पाहिला तर तो २०६ इथपर्यंत जातो. त्यासोबतच या काळात मोदींनी ८० हून अधिक माध्यमांना, वृत्त पत्रे, युट्यूबर, ऑनलाईन मिडिया यांना मुलाखती दिल्या. PM मोदी सरासरी दिवसाला २ पेक्षा जास्त रॅली, रोड शो कार्यक्रमात भाग घेतला तर निवडणुकीच्या घोषणेपूर्वी फेब्रुवारी आणि मार्चच्या १५ तारखेपर्यंत मोदींनी १५ रॅली केल्या होत्या.
सर्वात जास्त उत्तर प्रदेशात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात जास्त २२ जाहीर सभा आणि ३१ प्रचार मोहिम उत्तर प्रदेशात केल्या. त्यापाठोपाठ कर्नाटकात ११, तेलंगणात ११, तामिळनाडू ७, आंध्र प्रदेशात ५ आणि केरळमध्ये ३ रॅली केल्या. मोदींनी बिहारमध्ये २० प्रचार अभियान कार्यक्रमाला हजेरी लावली तर महाराष्ट्रात १९ सभा, रोड शो करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये २० पेक्षा जास्त रॅलीला हजेरी लावली. त्यानंतर ओडिशा, मध्य प्रदेशात १० ठिकाणी सभा घेतल्या. तर झारखंडमध्ये ७ रॅली घेतल्या. पंतप्रधान मोदींनी २०१९ च्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात रॅली, सभांवर भर दिला. गेल्या निवडणुकीत १४२ जाहीर सभा मोदींनी घेतल्या होत्या.