पटणा- Laluprasad Yadav on Muslim Reservation ( Marathi News ) बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी मुस्लीम आरक्षणाबाबत मोठं विधान केले आहे. मुस्लीमांना आरक्षण मिळालेच पाहिजे असा एल्गार करत लालू प्रसाद यादव यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
लालू प्रसाद यादव म्हणाले की, लोक आमच्या बाजूने आहेत. भाजपा घाबरली आहे. त्यांना संविधान संपवायचे आहे. जनतेला भाजपाचा खरा चेहरा समजला आहे. मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळायला हवं. मतदान चांगल्या रितीने होत आहे. भाजपा आरक्षणाची तरतूद हटवून लोकशाही आणि संविधान संपवणार असल्याचं जनतेच्या लक्षात आले आहे असं त्यांनी म्हटलं.
तर आरक्षण संपणार, संविधान संपणार, लोकशाही धोक्यात आहे हे जे बोलतायेत खऱ्या अर्थाने देशात आणीबाणीची घोषणा करून ज्यांनी लोकशाहीची हत्या केली ते आता लोकशाहीवर बोलतायेत. लोकांच्या मनात भीती दाखवून त्यांना मते मिळवायची आहेत. २०१५ मध्येही अशाच प्रकारे आरक्षण संपवणार असं बोलून प्रचार केला होता. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत त्यामुळे विरोधक असे आरोप करतायेत असा पलटवार लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर केला.
नुकतेच एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लीम आरक्षणावरून विधान केले होते. त्यात कर्नाटकात काँग्रेस नेतृत्वातील सरकारने धर्माच्या आधारे मुस्लीमांना आरक्षण दिले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अन्य प्रवर्गाला मिळणारं आरक्षण धर्माच्या आधारे मुस्लिमांना देऊ शकत नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत धर्माच्या आधारे आरक्षण करू देणार नाही असं मोदींनी म्हटलं होते. त्यावरून मुस्लिमांना आरक्षण देणारच असं लालू प्रसाद यादव यांनी सांगितले.