अहमदाबाद - PM Narendra Modi Voting ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावला. रानिपच्या निशान स्कूल मतदान केंद्रावर जात तिथे मतदान केले. यावेळी मोदींना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक हजर होते. उपस्थित लोकांना अभिवादन करत मोदी मतदान केंद्रावर पोहचले. त्याठिकाणी मोदींचे मोठे बंधू सोमाभाई मोदीही हजर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मे रोजी रात्री अहमदाबादला पोहचले. रात्री राजभवन येथे मुक्काम केल्यानंतर सकाळी अहमदाबादच्या रानिप येथे असलेल्या मतदान केंद्रावर गेले. तत्पूर्वी सोशल मीडियावरून मोदींनी लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केले. मोदी म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारांना आग्रह आहे, त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावं आणि नवा रेकॉर्ड बनवावा. तुमच्या सर्वांचा सक्रीय सहभाग लोकशाहीच्या या उत्सवाचा सन्मान आणखी वाढवेल असं त्यांनी सांगितले.
रानिप येथे राहतात मोदींचे बंधू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी हे रानिपमध्ये राहतात. मतदार म्हणून नरेंद्र मोदींचे नावही याच मतदारसंघात आहे. रानिपच्या निशान स्कूल मतदान केंद्रावर जात पंतप्रधान मोदींनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीतही याच मतदान केंद्रावर मोदी आले होते. रानिप हा भाग गांधीनगर लोकसभा मतदारसंघात येतो. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उमेदवारी दिली आहे. मोदी मतदान केंद्रावर येणार असल्याने भाजपा उमेदवार असलेले अमित शाह हेदेखील त्यांच्या स्वागतासाठी पोहचले होते.
अमित शाह दुसऱ्यांदा गांधीनगरमधून रिंगणात
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुसऱ्यांदा गांधीनगरमधून निवडणूक लढवत आहेत. २०१९ मध्ये या मतदारसंघात शाह यांनी आतापर्यंतचं सर्वात मोठं मताधिक्य घेत निवडून आले होते. काँग्रेसनं अमित शाह यांच्यासमोर सोनल पटेल यांना मैदानात उतरवलं आहे.