आदेश रावलनवी दिल्ली : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे शुक्रवारी मतदान होत आहे. मात्र, अमेठी आणि रायबरेलीतून निवडणूक कोण लढवेल हे गांधी कुटुंबाला अद्याप ठरविता आलेले नाही. आजच वायनाड (केरळ) मतदारसंघातही मतदान होत आहे. येथून राहुल गांधी मैदानात आहेत.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यावेळी लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी निवडणूक लढविल्यास गांधी कुटुंबातील तिन्ही सदस्य निवडणूक राजकारणाचा भाग बनतील आणि त्यामुळे घराणेशाहीचा आरोप होईल. हे टाळण्यासाठी त्यांनी निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
रायबरेली हा पारंपरिकपणे काँग्रेस अध्यक्षांचा मतदारसंघ असून, राहुल गांधी हे माजी पक्षाध्यक्ष आहेत. सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर राहुल गांधी दिल्लीला पोहोचतील. तेव्हा गांधी कुटुंब अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय घेईल. या दोन्ही मतदारसंघांबाबत काँग्रेस येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊ शकते.