धार्मिक ध्रुवीकरणाचा लढा आता विकासाच्या मुद्द्यावर; कटिहारमध्ये यंदा काय घडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 08:10 AM2024-04-21T08:10:49+5:302024-04-21T08:11:20+5:30
गाेस्वामी यांच्या विराेधातील ॲन्टी इन्कम्बन्सी प्रभावी ठरू नये या करिता नितीशकुमार लक्ष ठेवून आहेत
राजेश शेगाेकार
पाटणा : स्थानिक मुद्दे, समस्या, यावर कटिहारचे गणित ठरत नाही तर फक्त धार्मिक ध्रुवीकरण महत्त्वाचे ठरते हा इतिहास आहे. तब्बल ११ वेळा निवडणूक लढवून पाच वेळा खासदार झालेल्या काँग्रेसचे तारिक अन्वर यांचा प्रभावही गेल्यावेळी या ध्रुवीकरणामुळे चालला नाही. जेडीयूच्या दुलाल चंद गाेस्वामी यांनी त्यांचा कडव्या झुंजीत पराभव केला व आता हे दाेघे पुन्हा एकदा समाेरासमाेर आले आहेत.
गाेस्वामी यांच्या विराेधातील ॲन्टी इन्कम्बन्सी प्रभावी ठरू नये या करिता नितीशकुमार लक्ष ठेवून आहेत. जेडीयूच्या पारंपरिक मतांसह भाजपचे कॅडर ही जेडीयूची मोठी ताकद आहे. तर, कटिहारपुरता एमआयएमसोबत करार करून मुस्लीम मतांचे विभाजन रोखण्यात लालू यादव यशस्वी झाले. तसेच सीपीआयचा प्रभावसुद्धा तारीक अन्वर यांना दिलासा देऊ शकताे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
अल्पसंख्याक बहुल भागातील लोक जातीचा मुद्दा सोडून धर्माच्या आधारे मतदान करतात . तारिक अन्वर या परिसरातील बंद पडलेले उद्याेग, गिरण्या यांची चर्चा करत आहेत तर दुलालचंद हे नितीश कुमार आणि मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल बोलत आहेत. या मतदारसंघातील काॅंग्रेस भाजपकडे विधानसभेच्या प्रत्येकी दाेन तर जेडीयू व भाकपा यांच्याकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे त्यामुळे येथील लढत चुरशीची ठरणार आहे.