Loksabha Election 2024 Result : देशभरात दोन महिने चाललेल्या राजकीय लढाईनंतर आज निकाल हाती येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला भाजपच्या नेतृत्वातील NDA ने वेग पकडला, पण हळुहळू विरोधकांच्या INDIA आघाडीने मुसंडी मारायला सुरुवात केली. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपची 300 पार करताना दमछाक होताना दिसत आहे, तर विरोधक 250 च्या दिशेने वाटचाल करत आहेत. विशेष म्हणजे, भाजपला दक्षिणेतदेखील मोठा धक्का बसताना दिसत आहे.
विरोधकांची जोरदार मुसंडीमतदानापूर्वी भाजपला दक्षिणेत मोठ्या विजयाचा विश्वास होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे अनेक बडे नेते सातत्याने दक्षिणेत प्रचारसभा घेत होते. पण, आज सकाळपासून हाती आलेल्या निकालात भाजपला जोरदार धक्का बसताना दिसत आहे. उत्तर प्रदेशासह दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये इंडिया आघाडी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये इंडिया आघाडीनेही 230 जागांवर आघाडी घेतली आहे, तर एनडीए 300 पेक्षाही कमी जागांवर घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
दक्षिणेत काय परिस्थिती?लोकसभा निकालांच्या ताज्या ट्रेंडमनुसार, केरळमध्ये पहिल्यांदाच भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे, परंतु काँग्रेस चांगली कामगिरी करत. विशेषत: केरळ आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीवर आहे. कर्नाटकात काँग्रेस गेल्या वेळपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे संकेत देत आहेत. गेल्या वेळी काँग्रेसने केरळमध्ये 20 पैकी 15 जागा जिंकल्या होत्या. आता यंदाही काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे, तर यूडीएफ 5 जागांवर पुढे आहे. भाजप ज्या दोन जागांवर पुढे आहे, ती आघाडी शेवटपर्यंत कायम राहते का, हे पाहणे महत्वाचे आहे.
तामिळनाडूमध्येही काँग्रेस आणि डीएमके 36 जागांवर पुढे आहे. यात डीएमके 20 अन् काँग्रेस 8 जागांवर आघाडी घेत आहेत. तर, भाजप आणि मित्रपक्ष एआयएडीएमके दोन जागांवर पुढे आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि द्रमुकने मिळून 37 जागा जिंकल्या होत्या. त्यात द्रमुकला 23 तर काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या. यावेळीही तीच स्थिती असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकातील 28 जागांपैकी भाजपने गेल्या वेळी 25 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. यावेळी काँग्रेसने 08 जागांवर आघाडी घेतली असून भाजप 17 जागांवर पुढे आहे. तर जेडीएस 03 जागांवर आघाडीवर आहे.
तेलुगू भाषिक राज्यात भाजपचा फायदाआंध्र प्रदेशात भाजप आणि मित्रपक्ष असलेला तेलुगु देसम पार्टी 25 जागांवर आघाडीवर आहे. यापैकी टीडीपी 21 आणि भाजप 4 जागांवर, तर वायएसआर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचे येथे खाते उघडताना दिसत नाही. पण, तेलंगणामध्ये 17 जागांपैकी काँग्रेस 9 जागांवर तर भाजप 07 जागांवर पुढे आहे. ओवेसींची AIMIM 1 जागा जिंकू शकते. यंदा बीआरएस खाते उघडताना दिसत नाहीये.