गजानन चाेपडेगुवाहाटी : १४ लोकसभा मतदारसंघ असलेल्या आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात पाच जागांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान हाेणार आहे. या जागा नेहमीच बेभरवशाच्या राहिल्या आहेत, हे आजवरच्या निकालावरून स्पष्ट होते. येथे कोणताही पक्ष विजयाचा ठाम दावा करू शकत नाही. ज्या पक्षाच्या बाजूने मतदारांनी २०१४ च्या निवडणुकीत कौल दिला होता, त्याच पक्षाला २०१९ मध्ये सपाटून मार खावा लागला आहे.
दुसऱ्या टप्प्यात नौगांव, करीमगंज, सिलचर, दीफू आणि डरांग उदलगुरी या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. यात नौगांव मतदारसंघातून २०१४मध्ये भाजपचे राजेन गोहाईन विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रद्युत बोरदोलोई यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. सिलचर मतदारसंघात २०१४ साली काँग्रेसच्या सुष्मिता देव यांनी भाजपचा पराभव केला होता तर २०१९ मध्ये भाजपने वचपा काढत हा मतदारसंघ काबिज केला. बांगलादेशाच्या सीमेलगत असलेल्या करीमगंज मतदारसंघावर सर्व पक्षांची नजर असते. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेडिक फ्रंटने भाजपला पराभूत केले होते. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ही जागा पुन्हा बळकावली.
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना डच्चूनौगांव मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत विजयी झालेले माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहोईन यांना डच्चू देत भाजपने यंदा रुपक शर्मा यांच्यावर विश्वास दाखवला आहे. नौगांव मतदारसंघ हा आसाम राज्यातील प्रमुख मतदारसंघ मानला जातो. येथील साक्षरता दर राज्यात सर्वाधिक असून राजकीय घडामोडीचे हे शहर मुख्य केंद्र मानले जाते.
सिलचर लोकसभा मतदारसंघात नेहमी भाजप आणि काँग्रेसमध्येच थेट लढत असते. १९८० पासून तर आजपर्यंत येथील राजकारण काँग्रेसचे संतोष मोहन देव आणि भाजपचे कबिंद्र पुरकायस्था या दोन नेत्यांच्याच भोवती फिरत असते. २०१४ साली देव यांनी त्यांची कन्या सुष्मिता देव यांना उमेदवारी दिली आणि त्या जिंकल्या. कुशियारा नदीच्या तिरावर असलेल्या करीमगंज मतदार संघात ९० टक्के मतदार ग्रामीण भागातील आहेत. बांगलादेशच्या सीमेला लागून असल्यामुळे याठिकाणी घुसखाेरीचा प्रश्न गंभीर आहे.