नवी दिल्ली : अमेरिकेमध्ये वारसा कराची तरतूद आहे. सध्या संपत्तीच्या पुनर्वाटपाची चर्चा सुरू असून अशा निराळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असे विधान इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले. त्यावरून लोकसभा निवडणुकीत संपत्तीचे पुनर्वाटप हाच प्रमुख मुद्दा बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ विरोधी पक्ष सामान्य लोकांना लुटत राहणार आहेत, अशी टीका बुधवारी केली, तर वारसा कराबद्दल पित्रोदा यांनी वैयक्तिक मत व्यक्त केले असून पक्षाशी संबंध नाही, असे म्हणत काँग्रेसने हात झटकले.
गांधी घराण्याचे निकटवर्तीय असलेल्या पित्रोदा यांनी मुलाखतीत सांगितले, अमेरिकेमध्ये एखाद्याकडे १० कोटी डॉलरची संपत्ती असेल व तो मरण पावल्यास ४५ टक्के मालमत्ता मुलांना मिळते व ५५ टक्के मालमत्ता सरकार ताब्यात घेते. तुमच्या मृत्यूनंतर त्यातील विशिष्ट भाग जनतेसाठी ठेवला जाईल, असा संदेश या वारसा करातून अमेरिकी नागरिकांना दिला जातो. भारतात अशी काही सोय नाही. मात्र, संपत्तीच्या पुनर्वाटपाचा विचार सुरू असेल तर याचा विचार करावा असे पित्रोदा म्हणाले.
‘लोकांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा काँग्रेसचा विचार’संपत्तीच्या फेरवाटपाच्या धोरणाद्वारे विरोधक सामान्य माणसांची लूट करण्याचे काँग्रेसचे छुपे कारस्थान पित्रोदांच्या उद्गारांमुळे उघड झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी छत्तीसगढमधील अंबिकापूर येथील प्रचारसभेमध्ये म्हटले. लोकांच्या संपत्तीवर व आयुष्यभराच्या बचतीवर कायद्याच्या आधारे डल्ला मारण्याचा काँग्रेसचा विचार आहे. लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी जमविलेली संपत्ती आता काँग्रेस लुटून नेणार आहे. शाही परिवाराच्या शहजाद्याचे सल्लागार हे त्याच्या वडिलांचेही सल्लागार होते. मध्यमवर्गीयांवर आणखी कर लादण्याचा कॉंग्रेस पक्षाचा विचार असल्याचे ते म्हणाले. मध्यमवर्गाने अतिशय कष्ट करून पुंजी जमा केली आहे, ते पैसे लुटून नेण्याचा काँग्रेसचा इरादा आहे, अशी टीका मोदी यांनी सॅम पित्रोदा, तसेच राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
‘पित्रोदांच्या वक्तव्याशी काँग्रेसचा संबंध नाही’ वारसा कराबद्दल सॅम पित्रोदांनी काढलेले उद्गार ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या विचारांचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही, असे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. सॅम पित्रोदा यांच्या विधानावरून पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर केलेली टीका ही निवडणूक जिंकण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, अशी टीका कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
माझ्या विधानांचा केला विपर्यास : सॅम पित्रोदाअमेरिकेतील वारसा कराबद्दल मी वैयक्तिक मते मांडली होती; पण प्रसारमाध्यमांनी माझ्या विधानांचा विपर्यास केला. वारसा कराचा कायदा फक्त अमेरिकेत आहे आणि त्याबद्दल मी माझे वैयक्तिक मत एका मुलाखतीत व्यक्त केले होते. मी मांडलेल्या विचारांचा काँग्रेससहित कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, असेही सॅम पित्रोदा यांनी झालेल्या वादानांतर स्पष्ट केले आहे.
‘मेल्यानंतरही काँग्रेस कर लावणार’माणूस जिवंत असताना त्याला कर भरावेच लागतात; पण तो मरण पावल्यावरही कर लादण्याचा काँग्रेसचा विचार आहे. हा मध्यमवर्गावर काँग्रेसने केलेला हल्ला आहे. या सर्वसामान्य वर्गाने केलेली बचत त्यांच्या मुलांना मिळू नये म्हणून काँग्रेस प्रयत्नशील आहे. ही संघटित व कायदेशीर पद्धतीने केलेली लूट आहे - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री
कॉंग्रेसने केला व्हिडीओ शेअरवारसा कराला आमचा पाठिंबा आहे असे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा म्हणाले होते. तोच व्हिडीओ काँग्रेसने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.