प्रशांत शिंदे जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात उधमपूर मतदारसंघात १६ लाख मतदारांपैकी ६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ३७० कलम हटवल्यानंतर प्रथमच निवडणूक होत आहे. देशात पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानात उधमपूरची टक्केवारी चांगली आहे. मात्र, तेथील गतवेळीपेक्षा दोन टक्के कमी आहे. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला जम्मूत तर ७ मे ला अनंतनागमध्ये मतदान होणार आहे.
भाजपविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीमध्ये काश्मीरमधील तीन जागांवरून बिघाडी झाली. फारुख अब्दुला यांनी मेहबुबा मुफ्ती यांना जागा देण्यास नकार दिल्यानंतर मुफ्ती यांनी तिन्हीही जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे काश्मीरमधील श्रीनगर, बारामुला आणि अनंतनाग या जागांवर नॅशनल कॉन्फरन्सला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे, तर जम्मू, उधमपूर व लडाखमध्ये काँग्रेसला पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स व माकपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लढत जोरदार होणार आहे.
२०१९ मध्ये काय झाले?भाजपची कोणत्याही मोठ्या पक्षाशी आघाडी नाही. २०१९ मध्ये नॅशनल कॉन्फरन्सने श्रीनगर, बारामुला आणि अनंतनाग तर जम्मू, उधमपूर व लडाख या तीन जागांवर भाजपने विजय मिळवला होता.
या गोष्टी लक्षवेधी ठरणारअनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने यावेळी या मतदारसंघात उमेदवार दिला नाही. पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्याविरोधात नॅशनल कॉन्फरन्सने मियाँ अल्ताफ अहमद लारवी यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या उमर अब्दुल्ला यांनी यावेळी श्रीनगरऐवजी बारामुल्ला मतदारसंघातून अर्ज भरला आहे. तर श्रीनगरमधून शिया धर्मगुरू आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांना उमेदवारी दिली आहे. जम्मू लोकसभा मतदारसंघात जुगलकिशोर शर्मा यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने रमण भल्ला यांना उमेदवारी दिली आहे.