धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 02:18 PM2024-05-09T14:18:18+5:302024-05-09T14:31:59+5:30
Viral Video : मध्य प्रदेशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरात ९३ जागांवर मतदान पार पडलं. देशात ९३ मतदारसंघांत एकूण १,३५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा महत्त्वाच्या ठिकाणी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून काळजी घेण्यात येत आहे. मात्र आयोगाच्या सतर्कतेनंतरही अनेक ठिकाणी मतदानाच्या वेळी गैरप्रकार घडत असल्याचे समोर आलं आहे. अनेक मतदारांनी मतदानावेळी आपलं मत टाकताना त्याचे व्हिडीओ मोबाईलवर शूट केल्याचं समोर आलं आहे. आता सगळ्याची हद्द म्हणजे मध्य प्रदेशाता भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलाने मतदान केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भाजपचे जिल्हा पंचायत सदस्याचा हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर हे त्यांच्या अल्पवयीन मुलासह मतदान केंद्रावर पोहोचले होते. यावेळी विनय मेहर यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला मतदान करण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मेहेर यांनी याचे व्हिडीओ शूटिंग करुन तो फेसबुकवर देखील पोस्ट केला. मात्र हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर व्हिडिओ डिलीटही करण्यात आला. मात्र याप्रकरणी आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडेही या प्रकरणाची तक्रार पोहोचली आहे.
काँग्रेसने या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपसह निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते पीयूष बबेले यांनी हा व्हिडीओ एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. "भाजपने निवडणूक आयोगाला मुलांचे खेळणे बनवले आहे. भोपाळमध्ये भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला मतदान करायला लावले. विनय मेहर यांनी मतदान करताना एक व्हिडिओही बनवला आहे. विनय मेहरने हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. काही कारवाई होईल का?," असा सवाल काँग्रेस नेत्याने विचारला आहे.
भाजपा ने चुनाव आयोग को बच्चों का खिलवाड़ बना दिया है। भोपाल में भाजपा के जिला पंचायत सदस्य विनय मेहर ने नाबालिग बेटे से डलवाया वोट। वोट डालते वक्त का विनय मेहर ने वीडियो भी बनाया। वीडियो फेसबुक पर विनय मेहर ने किया पोस्ट।
— Piyush Babele||पीयूष बबेले (@BabelePiyush) May 9, 2024
कोई कार्रवाई होगी? pic.twitter.com/M7kSZUJtCW
मुलाच्या हट्टामुळे मतदान केंद्रावर नेले - विनय मेहेर
"मुलगा हट्ट करत होता. त्यामुळे त्याला मतदान केंद्रावर घेऊन गेलो होतो. चुकून व्हिडीओ शूट करुन तो फेसबुकवर अपलोड केला. माझं काही चुकीचं उद्दिष्ट नव्हतं," अशी प्रतिक्रिया विनय मेहेर यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग भाजप नेत्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जर तक्रार योग्य असेल तर गुन्हा नोंदवण्यात येईल. तसेच प्रकरणाशी संबधित अधिकाऱ्यांनाही निलंबित केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.