सुरतमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध; काँग्रेस म्हणते, ही तर ‘मॅच फिक्सिंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 06:54 AM2024-04-23T06:54:53+5:302024-04-23T06:55:49+5:30
निकालावरून वादंग; काँग्रेसचे नीलेश कुंभाणींचा अर्ज बाद ठरल्यानंतर पर्यायी उमेदवाराचा अर्ज केला रद्द; निवडणुकीतून आठ जणांची माघार
सुरत : छाननीवेळी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर अन्य उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने सुरतचे भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी दलाल यांच्या विजयाची घोषणा करत त्यांना प्रमाणपत्र दिले.
ही मॅच फिक्सिंग आहे. काँग्रेसच्या कुंभाणी यांचा अर्ज बाद केल्यानंतर आयोगाने काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज बाद केला. सूरतमधील रोषाला भाजप घाबरल्याने अशी मॅच फिक्सिंग केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे जयराम रमेश यांनी केला.
गुजरातमधील सर्व २६ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान आहे. त्यासाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. सुरत मतदारसंघातील बसपाचे प्यारेलाल भारती, तीन छोटे पक्ष व चार अपक्षांनी आपला अर्ज मागे घेतला.
तत्पूर्वी छाननीवेळी कॉंग्रेसचे नीलेश कुंभाणी यांच्या अर्जावरील सूचकांच्या स्वाक्षरी बनावट आढळल्याने अर्ज बाद ठरविला होता. कुंभाणी यांच्याऐवजी डमी उमेदवार असलेले सुरेश पडसाला यांचाही अर्ज बाद झाला होता. त्यामुळे भाजपचे मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे गुजरातमध्ये आता केवळ २५ जागांसाठी मतदान होईल.
कोर्टात आव्हान देणार : कॉंग्रेस
कॉंग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज भाजपच्या सांगण्यावरून रद्द करण्यात आला आहे. त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर टीका केली आहे.
९ खासदार पोटनिवडणुकीत विजयी
आतापर्यंत बिनविरोध निवडून आलेले बहुतांश खासदार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले आहेत. तर समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांच्यासह ९ जण पोटनिवडणुकीत बिनविरोध विजयी झाले आहेत.
आजवरच्या निवडणुकीत ३५ खासदार बिनविरोध
१९५१ पासून आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण ३५ खासदार बिनविरोध निवडणूक आले आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने तथा अर्ज मागे घेतल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. यापूर्वी २०१२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव या उत्तर प्रदेशच्या कन्नौजमधून बिनविरोध निवडून आल्या होत्या. लोकसभेसोबतच सुरू असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचे १० आमदार बिनविरोध विजयी ठरले.
बिनविरोध निवडून आलेले प्रमुख नेते
यशवंतराव चव्हाण, फारूख अब्दुल्ला, एच. के. माहताब, टी. टी. कृष्णमाचारी, पी. एम. सईद, एस. सी. जमीर हे प्रत्यक्ष निवडणूक न लढविताही थेट लोकसभेत पोहोचले होते. त्यापैकी सिक्कीम व श्रीनगरमधील उमेदवार दोनवेळा बिनविरोध विजयी झाले होते.