नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलंय. आतापर्यंत अर्ध्याहून अधिक जागांवर मतदान झालं. त्यात विरोधी पक्षाने प्रत्येक टप्प्यातील मतदानानंतर भाजपा सत्तेपासून दूर जातेय अशी विधाने करण्यास सुरुवात केली. नरेंद्र मोदी आता पुन्हा देशाचे पंतप्रधान बनणार नाहीत असं राहुल गांधी म्हणाले. तर भाजपा सत्तेची हॅटट्रिक करण्याचा दावा करत आहे.
विरोधी पक्षाच्या दाव्यानुसार, सत्तेविरोधात नाराजीची लाट, युवक नाराज आहेत मग भाजपाची अपेक्षा कुठल्या मतदारावर आहे, ज्याच्या बळावर पुन्हा एकदा सत्तेत येण्याची अपेक्षा करत आहे हे जाणून घेऊ, एक महिन्यापूर्वी देशात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल अशी सर्वसामान्य धारणा होती. परंतु संविधान आणि देशातील लोकशाही वाचवण्यासाठी मोदी पुन्हा सत्तेत नको असं वातावरण तयार करण्यात विरोधकांना यश आलं. देशातील काही भागात कमी मतदान, ग्राऊंडवर सत्ताविरोधी लाट, पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर विरोधकांनी भाजपा सत्तेपासून दूरावतेय असा अजेंडा सेट करणे सुरु केले. भाजपानं गेल्या १० वर्षात सबका साथ, सबका विकास असा जो नारा दिला त्यात विरोधकांनी संविधान आणि लोकशाही धोक्यात असल्याचं सांगून खिंडार पाडलं. २०२४ च्या निवडणुकीत मोदींचा सायलेंट वोटर किंगमेकरच्या भूमिकेत नजर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सायलेंट वोटर म्हणजे महिला, ज्या मोठ्या प्रमाणात मोदींमुळे भाजपासोबत उभ्या आहेत. भाजपाच्या सत्तेच्या राजकारणात महिला मतदारांची मोठी भूमिका आहे. या महिला मतदारांमुळे पंतप्रधान मोदींनी २०१४ आणि २०१९ या काळात पूर्ण बहुमताने केंद्रात सत्ता आणली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला देशातील ३६ टक्के महिलांनी मतदान केले होते. पंतप्रधान मोदीही स्वत: महिला मतदारांकडे मोठ्या आशा ठेवून आहेत.
ज्येष्ठ पत्रकार हेमंत तिवारी सांगतात, नरेंद्र मोदी यांची सर्वात मोठी ताकद आणि सत्तेत येण्याचं कारण म्हणजे महिला मतदार, २०१४ ला मोदी सत्तेत आले तेव्हापासून त्यांच्या सरकारच्या अनेक योजना महिला केंद्रीत करण्याला सुरुवात केली. आज देशातील गरिबांच्या घरी शौचालय बनवण्याचा निर्णय महिलांच्या मान सन्मानाशी जोडला जातो. उज्ज्वला योजनेतंर्गत १० कोटीहून अधिक महिलांना घरगुती गॅस सिलेंडर देणे. जलसंकटाचा सामना करणाऱ्या महिलांना हर घर जल अभियानाशी जोडणे. इतकेच नाही तर पीएम आवास योजनेतून बनणाऱ्या ६० टक्क्याहून अधिक घरांना महिलांच्या मालकीचा अधिकार देणे. गर्भवती महिलांसाठी मातृ वंदन योजना, ज्यात महिलेला बाळाच्या जन्मानंतर ६ हजार रुपयांची मदत, पीएम स्वनिधी योजना, मुद्रा योजना, लखपती दिदीसारख्या योजनांमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. या योजनांचा लाभ झाल्यानं महिला भाजपासोबत राहतील असं भाजपा नेत्यांना वाटते.
महिला मतदारांची ताकद
देशात ५ वर्षापूर्वी ४३.८ कोटी महिला मतदार होत्या. ज्या आता ४७.१ कोटीहून अधिक झाल्यात. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, २०२४ च्या निवडणुकीत एकूण ९६.८ कोटी मतदार आहेत, ज्यात पुरुष ४९.७ कोटी तर ४७.१ कोटी महिला मतदार आहेत. गेल्यावेळच्या तुलनेने महिला मतदारांची संख्या साडे चार कोटीनं वाढली आहे. त्यामुळे महिला मतदारांची मोठी भूमिका आहे. काँग्रेसपासून सर्व विरोधी पक्ष महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देत आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिला मतदारांवरील करिष्मा फारसा कमकुवत करू शकले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत महिला मतदार भाजपासाठी मोलाची भूमिका बजावेल असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं.