गाझियाबाद - Rahul Gandhi on BJP ( Marathi News ) ही निवडणूक विचारधारेची आहे. भाजपा संविधान संपवणार आहे. संविधान वाचवण्याची ही निवडणूक असून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत. या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशात राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात राहुल गांधी म्हणाले की, एकीकडे भाजपा आणि RSS संविधान, लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करतेय. या निवडणुकीत २-३ मोठे मुद्दे आहेत. बेरोजगारी, महागाई हे सर्वात मोठे मुद्दे आहेत. परंतु लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम भाजपा करते. ना पंतप्रधान, ना भाजपा या मुद्द्यावर बोलतेय. इलेक्टोरल बॉन्ड जर योग्य होता मग सुप्रीम कोर्टाने ते रद्द का केले? ज्या लोकांनी भाजपाला हजारो कोटी रुपये दिले, ते लपवले का? ज्यांना कंत्राटे दिली जातात त्यांच्याकडून भाजपाला कोट्यवधीची देणगी येते असा आरोप त्यांनी केला.
तसेच मी जागांबाबत भविष्यवाणी करत नाही. १५-२० दिवसांपूर्वी मला वाटत होते, भाजपा १८० जागा जिंकेल. परंतु आता १५० जागा भाजपाला मिळतील असं वाटतं. आम्हाला प्रत्येक राज्यातून इंडिया आघाडी मजबूत होतेय असा रिपोर्ट मिळतोय. उत्तर प्रदेशात आमची आघाडी असून ती चांगली कामगिरी करेल असंही राहुल गांधींनी म्हटलं.
दरम्यान, भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी असून आश्वासनेही फोल ठरली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. विकासाची स्वप्ने दाखवली तीदेखील अर्धवट आहेत. इलेक्टोरल बॉन्डनं भाजपाचा बॅन्ड वाजवला आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांसाठी भाजपा सुरक्षित स्थळ आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना भाजपाने सोबत घेतले. भाजपाने अनेक लोकांचे भवितव्य अंधारात टाकलं आहे अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.