आकर्षक, चटपटीत घोषणांनी गाजवल्या लोकसभेच्या निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 05:41 AM2019-03-22T05:41:33+5:302019-03-22T05:41:55+5:30

‘घोषवाक्य’ हे एक असे हत्यार आहे, जे अगदी अल्पकाळात सर्वसामान्यांवर प्रभाव पाडू शकते. याचा प्रत्यय स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण घेत आलो आहोत.

Loksabha election conducted by attractive, spicy announcements | आकर्षक, चटपटीत घोषणांनी गाजवल्या लोकसभेच्या निवडणुका

आकर्षक, चटपटीत घोषणांनी गाजवल्या लोकसभेच्या निवडणुका

googlenewsNext

नवी दिल्ली : ‘घोषवाक्य’ हे एक असे हत्यार आहे, जे अगदी अल्पकाळात सर्वसामान्यांवर प्रभाव पाडू शकते. याचा प्रत्यय स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण घेत आलो आहोत. त्यामुळे या आयुधाचा वापर राजकारण्यांनी केला नसेल, तर नवलच! स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत घोषवाक्यांनी आपला दबदबा निर्माण केला. काही पक्षांनी तर घोषवाक्यांच्या जोरावर निवडणुकाही जिंकल्या आहेत. ‘नया भारत’, ‘गरिबी हटाव’, ‘अबकी बार...’ अशा काही घोषवाक्यांचा बोलबाला आजही कायम आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून, आघाडीचे सर्वच पक्ष मतदारांना भुरळ पाडतील, अशी घोषवाक्ये तयार करण्यात गुंतले आहेत.

१९५० च्या दशकात भारतात साक्षरतेचे प्रमाण केवळ १८ टक्के इतके होते. त्यामुळे छापील शब्दांपेक्षा उच्चारित शब्दांच्या साहाय्याने सामान्य मतदारांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचता येऊ शकते, हे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी ओळखले होते. १९५१-५२ च्या निवडणुकीत त्यांनी ‘नया भारत बनाऐंगे’ अशी घोषणा देत मतदारांना भावनिक आवाहन केले होते.
शिवाय जनसंघावर टीका करताना ‘स्थायी, असांप्रदायिक प्रगतीशील राष्ट्र के लिए’ असे म्हटले होते. या घोषणा त्या वेळी अगदी जनतेच्या ओठांवर रुळल्याचे विश्लेषक सांगतात.

१९७१ साली इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा देत बहुमत खेचले होते. ‘वो कहते हैं इंदिरा हटाव, मै कहती हूँ गरिबी हटाव’ अशा घोषवाक्याचा त्यांनी वापर केला होता. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनसंघाने ‘इंदिरा हटाव, देश बचाव’ अशी घोषणा दिली होती. मात्र, हे सरकार अल्पावधीतच कोसळले. त्या वेळी इंदिरा गांधींनी जनसंघावर प्रखर हल्ला चढवत ‘सरकार वो चुने, जो चल सकें’ अशी खोचक टिपणी केली होती.

१९९० च्या निवडणुकीत राजीव गांधी यांनी ‘ना जात पर, ना पात पर, स्थिरता की बात पर, मोहर लगेगी हात पर’ अशी घोषणा दिली होती. तर भाजपाने या निवडणुकांना सामोरे जाताना ‘सबको परखा, हमको परखो’ हे घोषवाक्य निवडले होते.

२०१४ च्या निवडणुकीत तर भाजपाने घोषवाक्यांचा मतदारांवर माराच केला होता. ‘अबकी बार मोदी सरकार’, ‘अच्छे दिन आयेंगे’, ‘सबका साथ, सबका विकास’ अशा बहुसंख्य घोषणा त्यांनी दिल्या होत्या. सध्या देशात निवडणुकीचा माहौल आहे. त्यामुळे सर्व पक्ष मतदारांना भावतील अशा घोषवाक्यांच्या शोधात आहेत. भाजपाने तर ‘मोदी है, तो मुमकीन है’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशा घोषणा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच देण्यास सुरुवात केली होती. काँग्रेसकडेही देशभरातील कार्यकर्त्यांनी सुमारे १५ लाख घोषवाक्ये पाठविली आहेत. मात्र, राजकारण्यांच्या या क्लृप्त्या हल्लीच्या तरुण, सुशिक्षित मतदारांना कितपत प्रभावी करू शकतील, याचे उत्तर मतदानानंतरच मिळेल.

काही लोकप्रिय घोषवाक्ये

१) नया भारत बनाऐंगे - पं. जवाहरलाल नेहरू, १९५१
२) वाह रे नेहरू तेरी मौज, घर मे हमला बाहर फौज - जनसंघ - १९६२
३) वो कहते है इंदिरा हटाव, मै कहती हूँ गरिबी हटाव - इंदिरा गांधी, १९७१
४) इंदिरा हटाव, देश बचाव - जनसंघ (आणीबाणीच्या काळात)
५) सबको परखा, हमको परखो - भाजपा, १९९१
६) अबकी बारी, अटल बिहारी - भाजपा, १९९८
७) वो कहते है मोदी हटाव, मै कहता हुँ भ्रष्टाचार, काला धन, आतंकवाद हटाव - नरेंद्र मोदी, २०१९

Web Title: Loksabha election conducted by attractive, spicy announcements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.