'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 01:01 PM2024-05-12T13:01:11+5:302024-05-12T13:01:55+5:30

Indore Lok Sabha NOTA : मध्य प्रदेशच्या इंदूर मतदारसंघात काँग्रेसने नोटाचा जोरदार प्रचार सुरु केला आहे.

Loksabha Election Congress is seeking votes for NOTA in Indore Constituency | 'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

Indore Lok Sabha Election : मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघ सध्या देशभरात चर्चेत आला आहे. इथं काँग्रेस मतदारांना ईव्हीएमवरील नोटा बटण दाबण्याचे आवाहन करत आहे. इंदूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी काही दिवसापूर्वी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत होती. मात्र बम यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचा विजय निश्चित झाला आहे. दुसरीकडे मात्र भाजपला धडा शिकवा म्हणत काँग्रेसने नोटाचा प्रचार सुरु केला आहे.

इंदूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अक्षय कांती बम यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपशी हातमिळवणी केल्याने काँग्रेस चांगलीच संपातली आहे. त्यामुळे काँग्रेसने आता नोटासाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे. काँग्रेस कार्यकर्ते मतदारसंघात भिंतींवर आणि रिक्षांवर पोस्टर चिकटवत आहेत.काँग्रेसने मशाल रॅली आणि सभांचे आयोजन करुन मतदारांना १३ मे रोजी ‘नोटा’समोरील बटण दाबा आणि भाजपाला धडा शिकवा असे, असे आवाहन केलंय.

आमचा पक्ष कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांनी म्हटले आहे. भाजपला धडा शिकवण्यासाठी त्यांनी नोटा मतांचा विक्रम निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन वर्मा यांनीही मतदारांना नोटाला मत देण्याचे आवाहन केलं आहे. आमचा काँग्रेसचा उमेदवार काही लोकांनी चोरला आहे. त्या लोकांनी तुमचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला आहे. या चोरांना धडा शिकवायचा असेल तर नोटा बटण दाबा आणि लोकशाही वाचवा, असं सज्जन वर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या नोटा मोहिमेवर भाजपची प्रतिक्रियाही समोर आली आहे. नोटा दाबण्यासाठी लोकांना भडकवणे हा लोकशाहीत गुन्हा आहे, असे मध्य प्रदेश भाजपचे प्रमुख व्हीडी शर्मा म्हणाले.

महत्त्वाचे म्हणजे ,निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार नोटासाठी मिळालेली मते मोजली जातात पण ती रद्द मानली जातात. नोटाला १०० टक्के मते मिळाल्यास निवडणूक रद्द होईल आणि पुन्हा मतदान घेण्यात येईल. मात्र जर कोणत्याही उमेदवाराला एक मत मिळाले तर त्याला विजयी घोषित केले जाईल आणि नोटा मते रद्द समजली जातील.

Web Title: Loksabha Election Congress is seeking votes for NOTA in Indore Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.