Loksabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी नागरिक मतदानासाठी मोठ्या संख्येने सकाळपासूनच बाहेर पडले होते. यामध्ये जेष्ठ नागरिकांपासून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा देखील समावेश होता. मात्र या सगळ्यात कर्नाटकमध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे डॉक्टर हे देवाचं रुप असतात याचा प्रत्यय आला.
क्षणाचाही विचार न करता केलेली कृती आणि वैद्यकीय कौशल्याच्या उल्लेखनीय वापर करत बंगळुरूच्या एका डॉक्टरने शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात मतदानासाठी आलेल्या एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. बंगळुरुच्या जेपी नगर येथील मतदान केंद्रावर रांगेत उभे असताना एका महिलेसोबत हा सगळा प्रकार घडला.
जेपी नगर मतदान केंद्रावर एक महिला रांगेत उभी असताना अचानक खाली कोसळली. या प्रकारामुळे आजूबाजूचे मतदार देखील घाबरले. घडलेल्या प्रकाराची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र तोपर्यंत शेजारच्या रांगेत उभ्या असलेल्या एका डॉक्टरांनी धाव घेत महिलेला जीवनदान दिलं.
मतदानासाठी आलेल्या महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला. पाणी पित असतानाच ही महिला खाली कोसळली होती. त्यावेळी मतदानासाठी नारायणा हेल्थ सेंटरमधील डॉ. गणेश श्रीनिवास प्रसाद हे देखील शेजारच्या रांगेत उभे होते. त्यांनी घडलेला प्रकार पाहताच ५० वर्षीय पीडित महिलेकडे धाव घेतली आणि तातडीने तिला सीपीआर दिला. सुदैवाने काही मिनिटांत महिला शुद्धीत आली.
या सगळ्या प्रकाराची माहिती डॉ. गणेश श्रीनिवास प्रसाद यांनीच ‘एक्स’वरून दिली आहे. " रांगेत उभं असताना त्या महिलेला हृदयविकाराचा झटका आला. मी त्या महिलेची नाडी तपासली ती खूप कमी होती. तिचे डोळे तपासले असता कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. महिलेच्या शरीरात कोणतीही प्रतिक्रिया दिसून आली नाही आणि तिचा श्वास गुदमरत होता. मी ताबडतोब सीपीआर दिला आणि त्यांची प्रकृती सुधारली. मग इलेक्शन ड्युटीवर असलेल्या लोकांनी धावत येऊन ज्यूस दिला. रुग्णवाहिका बोलावून महिलेला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. उपचार करायला थोडा जरी उशीर झाला तर तिच्या जीवाला धोका होता," असे गणेश प्रसाद यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देशातल्या १३ राज्यात ८८ जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. आकडेवारीनुसार त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये सर्वाधिक मतदान झालं आहे. तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान झालं आहे.