Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी कायमच ओळखले जातात. त्याच्या मंत्रालयाच्या कामाच्या बाबतीतही ते कठोर भूमिका घेत असतात. आपल्या भाषणांदरम्यानही ते अनेकदा आपल्या कामांबाबत याचा उल्लेख करतात. अशातच आता नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु झालीय. नितीन गडकरी यांनी बिहार येथील निवडणूक सभेला संबोधित केले. नितीन गडकरींनी ही घोषणा केली आणि ती पूर्ण केली नाही, असे कोणत्याही आईचा मुलगा म्हणू शकत नाही, असे निती गडकरी यांनी म्हटलं आहे.
यावेळी बिहारमधील बेगुसरायमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीचे राजकारण करणाऱ्यांनाही फटकारले. जो कोणी जातीबद्दल बोलेल त्याला लाथ मारली जाईल. जनतेचा प्रश्न अन्न, वस्त्र आणि निवारा आहे. ज्या दिवशी हे सर्वांना मिळेल त्या दिवशी माझे काम पूर्ण होईल, असं गडकरी म्हणाले. नितीन गडकरी बेगुसराय येथील भाजपचे उमेदवार गिरिराज सिंह यांच्या प्रचारासाठी बागडोब येथे बोलत होते.
माझ्याकडे पैशांची कमी नाही. माझ्या हातात द्रौपदीचे ताट आहे, जे कधीही रिकामे नसते. मी सांगतो ते करतो. निवडणुकीनंतर गंगा नदीवरील शामो-मटिहाणी पुलाचे काम सुरू होईल. बेगुसरायचे खासदार गिरीराज सिंह यांच्या विनंतीवरून हा पूल बांधण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वांगीण विकास होत आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांचाही विकास झाला आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. दरम्यान, मंत्री गिरीराज सिंह यांनी मी हिंदू-मुस्लिम राजकारण करतो असं म्हटलं होतं. त्यावरच बोलताना नितीन गडकरी यांनी मी जाती धर्माचे राजकारण करत नाही असं म्हटलं. "मी जाती-धर्माचे राजकारण करत नाही. माझे राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर आधारित आहे. जाती-धर्माचे राजकारण करणाऱ्यांचा मला तिरस्कार आहे. तुम्ही माझ्याकडून मागण्यात कंजूषपणा करू नका. तुम्ही जे मागाल ते मी पूर्ण करीन," असंही गडकरींनी म्हटलं.
मी हिंदू-मुस्लिम राजकारण करतो - गिरीराज सिंह
"लोक म्हणतात की गिरिराज सिंह हिंदू-मुस्लिम राजकारण करतात. मी हिंदू-मुस्लिम राजकारण करतो हे मला मान्य आहे. पण मी विकासाचेही राजकारण करतो. माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हजारो कोटी रुपये खर्चून बेगुसरायचा विकास झाला आहे," असं गिरीराज सिंह म्हणाले.